Lalit Modi on Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आणि दबावामुळेच आपल्याला क्रिकेट प्रशासनातून बाहेर पडावे लागले, असा दावा लंडनला पळालेल्या ललित मोदीने केला होता. आता दाऊदकडे कोण घेऊन गेलं? याचाही गौप्यस्फोट ललित मोदीने ट्विटरवर केला आहे.

Continues below advertisement

काय म्हणाला ललित मोदी?

ललित मोदीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हाच तो अंशुमन मिश्रा ज्याने मला पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी नेलं. लंडनमधील पार्क स्ट्रीटमध्ये मला धमकी देत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला. ललित मोदीने सोबत अंशुमन मिश्राचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या काळात मॅच-फिक्सिंगला कडाडून विरोध केल्याचा दावा ललित मोदीने केला होता. त्यामुळे डी-कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या 'सट्टा बाजारा'शी थेट संघर्ष झाल्याचा दावा केला होता.

सट्टा आता 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला

दोन दिवसांपूर्वी ललित मोदी म्हणाला होता की, दाऊद इब्राहिम हा क्रिकेट बुकींवर नियंत्रण ठेवून होता. पूर्वी एका सामन्यावर 2 अब्ज डॉलर्सचा सट्टा लावला जायचा, जो आता 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आता संपूर्ण सामने फिक्स केले जात नाहीत, तर मैदानावरील गुप्त संकेतांचा वापर करून विशिष्ट चेंडू किंवा षटके फिक्स केली जातात, असा दावा मोदीने केला आहे. आपल्या कार्यकाळात पहिल्या तीन वर्षांत आयपीएलमध्ये कोणतेही फिक्सिंग झाले नाही. संशयास्पद लोकांना स्टेडियममध्ये येण्यास बंदी घातली होती आणि त्यांच्यावर कारवाई केली होती, जे माफियांना आवडले नाही, असेही त्याने म्हटलं आहे. 

म्हणून जगभरातून हल्ल्यांचे सत्र सुरू झाले

मोदी म्हणाला की, या प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी माफियांनी कोट्यवधी डॉलर्सच्या लाचेची ऑफर दिली होती, परंतु नाकाल्याचेही त्यानं म्हटलं होतं. 2012 मध्ये 'बाबा' नावाच्या एका दलालाने सॅटेलाइट फोनवरून दाऊद इब्राहिमशी त्यांचा थेट संपर्क करून दिला होता. आयपीएलमध्ये अंडरवर्ल्डसाठी स्वतःचा संघ मिळवून देण्यासाठी दाऊदने दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदची मागणी धुडकावून लावल्यामुळे जगभरातून हल्ल्यांचे सत्र सुरू झाले. या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी 'झेड' सुरक्षा (Z-security) दिली होती. मुंबईतील घराबाहरे गोळीबार झाला, जोहान्सबर्ग व मॉन्टेनेग्रोमध्ये हल्ल्याचा कट रचला गेला आणि लंडनमध्ये मुलाचे 'बाबा अवीन' नावाच्या व्यक्तीने अपहरण देखील केले होते, असा दावा ललित मोदीने केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या