सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली.


ही वन डे मालिका कर्णधार विराट कोहलीच्या शतकांसोबतच भारतीय फिरकीपटू जोडी यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीनेही गाजवली. दोघांच्या फिरकीतून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज स्वतःला वाचवू शकले नाहीत. दोघांनी मिळून या मालिकेत तब्बल 33 विकेट घेतल्या.

विशेष म्हणजे सहा सामन्यांच्या या वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांनी मिळून 27 विकेट घेतल्या, तर केवळ कुलदीप आणि चहलनेच 33 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सहा वन डेत अनुक्रमे 4, 1, 6, 7, 7, 2 अशा विकेट घेतल्या.

लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने सहा सामन्यात 16, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 17 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटू जोडीचं कोडं अजूनही उलगडलेलं नाही. भारताकडे जगातील सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिन गिब्सन यांनीही मान्य केलं होतं.