Koneru Humpy vs Divya Deshmukh FIDE Women's Chess World Cup Final : महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपचा अंतिम सामना यंदा खूपच रोमांचक ठरला आहे. कारण या वेळी कोणताही खेळाडू जिंको, पण ट्रॉफी भारतातच येणार आहे. याचं कारण म्हणजे या वर्षीच्या अंतिम फेरीत दोन्हीही खेळाडू भारताच्या आहेत. जॉर्जिया देशाच्या बटुमी शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये अंतिम फेरीतचा सामना रंगला आहे.

बुद्धिबळच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू आमने-सामने आल्या आहेत. त्यामुळे हा सामना भारतासाठी खास आणि अभिमानास्पद आहे. शनिवारी, 26 जुलै रोजी कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात अंतिम फेरीतील पहिला गेम खेळला गेला, जो 41 चालींनंतर बरोबरीत संपला.

पहिल्या गेममध्ये काय घडलं?

दिव्या देशमुख हिने पांढऱ्या प्याद्याने खेळताना सुरुवातीला खूप चांगली केली. हम्पीने नंतर मान्य केलं की तिने सुरुवातीच्या काही चाली चुकल्या. अकराव्या चालीनंतर दिव्याच्या बाजूने खेळ झुकलेला होता. पण दिव्या ही संधी टिकवू शकली नाही आणि 14व्या चालीनंतर दोघींची स्थिती पुन्हा सारखी झाली.

दिव्याने काही चालींमध्ये जास्त वेळ घेतला, त्यामुळे 25व्या चालीनंतर तिच्या घड्याळावर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ उरला होता. अशा वेळेतही तिने 29व्या चालीनंतर तीन वेळा सारखी स्थिती येऊनसुद्धा बरोबरी स्वीकारली नाही, हे थोडं आश्चर्यकारक होतं.

'या' स्पर्धेत पांढऱ्या प्याद्याने हरलेली नाही कोनेरू हम्पी

34व्या चालीनंतर हम्पीकडून एक छोटी चूक झाली, पण दिव्या त्याचा फायदा घेऊ शकली नाही. शेवटी 41व्या चालींनंतर पुन्हा एका स्थिती तिसऱ्यांदा सारखी आल्याने हम्पीने बरोबरी जाहीर केली. हा निकाल हम्पीसाठी चांगला आहे, कारण उद्या तिला पांढऱ्या प्याद्याने खेळायला मिळेल. ती या स्पर्धेत पांढऱ्या प्याद्याने अजून हरलेली नाही.

दुसरा गेम रविवारी 27 जुलै रोजी सायंकाळी 4:45 वाजता होईल. जर उद्याचाही सामना बरोबरीत संपला, तर सोमवारी 28 जुलै रोजी टाय-ब्रेक्सद्वारे विजेता ठरवला जाईल.

विजेत्याला 41.6 लाखांचे पारितोषिक! 

  • विजेत्या खेळाडूला $50,000 (सुमारे ₹41.6 लाख रुपये) दिले जातील.
  • उपविजेत्याला $35,000 (सुमारे ₹29.1 लाख रुपये) दिले जातील.