कोलकाता : लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दिलेल्या 166 धावांच्या सलामीने कोलकाता कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच भारताने चौथ्या दिवसअखेर एक बाद 171 अशी दमदार मजल मारली.

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी लोकेश राहुल 73, चेतेश्वर पुजारा दोन धावांवर खेळत होता. शिखर धवनचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. त्याने 116 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 94 धावांची खेळी उभारली. राहुलने 8 चौकारांनी नाबाद 73 धावांची खेळी सजवली.

त्याआधी, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी आक्रमणाला श्रीलंकेने रंगाना हेराथच्या प्रतिहल्ल्यातून दिलेलं उत्तर सरस ठरलं. त्यामुळेच श्रीलंकेला पहिल्या डावात भारतावर 122 धावांची आघाडी घेता आली.

शमीने 88 धावांत चार आणि भुवनेश्वरने शंभर धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून श्रीलंकेला रोखण्यासाठी शिकस्त केली. पण हेराथने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून श्रीलंकेला सर्व बाद 292 धावांची मजल मारून दिली. हेराथने 105 चेंडूंत नऊ चौकारांसह 67 धावांची खेळी उभारली.