नवी दिल्ली : तब्बल 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आलेला किंग विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर हजारो चाहत्यांनी विराटसाठी गर्दी केली होती, पण कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. अरुण जेटली स्टेडियमवर किंग कोहली कोणतीही चमत्कारिक कामगिरी करू शकला नाही आणि अवघ्या 6 धावा करून बाद झाला. कोहली आऊट होताच अरुण जेटली स्टेडियमवर भयाण शांतता पसरली.
कोहलीला बाद करणाऱ्या रेल्वेच्या गोलंदाजाचे दिल्लीशी खास नाते आहे. दिल्लीच्या पहिल्या डावात रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बोल्ड केले. यश धुल (32) बाद झाल्यानंतर कोहली मैदानात आला. यश बाद झाल्यावर दिल्ली संघाची धावसंख्या 78/2 झाली. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन अरुण जेटली स्टेडियममध्ये बॅटिंगसाठी आला तेव्हा प्रेक्षकांनी कोहली-कोहलीच्या घोषणाबाजी सुरू केली.
कोहलीची शिकार करणारा हिमांशू सांगवान कोण?
हिमांशू सांगवान 29 वर्षीय असून तो उजव्या हाताने मध्यमगती वेगवान गोलंदाजी करतो. हिमांशू सांगवानचा जन्म 2 सप्टेंबर 1985 रोजी दिल्लीतील नजफगड भागात झाला. वीरेंद्र सेहवागही येथून पुढे आला आहे. रेल्वे संघातून खेळण्यापूर्वी तो दिल्लीच्या अंडर-19 संघाचा भाग होता. दिल्ली विरुद्ध रेल्वेच्या या सामन्यापूर्वी हिमांशू सांगवानने 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 77 विकेट घेतल्या असून त्याच्या नावावर 106 विकेट्स आहेत. त्याच वेळी, त्याने 17 लिस्ट ए सामन्यांमध्ये 21 विकेट आणि 10 धावा केल्या आहेत. हिमांशूने 7 टी-20 सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याने 5 विकेट घेतल्या आहेत आणि 10 धावा केल्या आहेत.
कोहलीला बाद होताच चाहते निराश
विराट कोहलीला केवळ 6 धावा करता आल्या. त्याने एक शानदार स्ट्रेट डायव्ह चौकारही मारला. मात्र यानंतर तो आपला डाव जास्त काळ वाढवू शकला नाही आणि कोहली आऊट होताच कोटला येथील चाहत्यांनी मैदान सोडण्यास सुरुवात केली. ESPN क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी अरुण जेटली स्टेडियममध्ये सुमारे 15,000 प्रेक्षक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीही जवळपास तेवढ्याच संख्येने प्रेक्षक कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी आले होते. चाहत्यांची कोहलीबद्दलची उत्कंठा एवढी होती की, स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी हाणामारी झाली. पहिल्या दिवशी तीन चाहते जखमी झाले, तर दुसऱ्या दिवशीही पहाटे पाच वाजल्यापासूनच चाहते स्टेडियमबाहेर जमा झाले. मात्र, कोहलीने स्वस्तात बाद होऊन त्या सर्व चाहत्यांची मने तोडली. कोहली आऊट होताच स्टँड जवळपास रिकामे झाले आणि एक प्रकारची शांतता पसरली.
इतर महत्वाच्या बातम्या