नवी दिल्ली : पहिल्या दिवसापासून खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राच्या कामगिरीस गुरुवारी खिळ बसली. वैभवराजे रणदिवेच्या नेमबाजीतील ब्रॉंझपदकाचा महाराष्ट्राला दिलासा मिळाला. आज एकाच पदकावर समाधान मानावे लागल्याने पदककालिकेत महाराष्ट्राला पाचव्या स्थानावर घसरावे लागले.
महाराष्ट्राची ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्रॉंझ अशी एकूण २६ पदके झाली आहेत. हरियाणा (३४, ३६, १८) ८८ पदकांसह आघाडीवर कायम आहे. उत्तर प्रदेशाची (२४, १७, ९) ५०, तर तमिळनाडूची (१७, ६, ११) ३४ आणि गुजरातची (९, १५, ११) ३५ पदके झाली असून, ते अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्राला आज नेमबाजीत वैभवराजे रणदिवे याने १०९ मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात ब्रॉंझपदक मिळवून दिले. वैभवराजने पात्रता फेरीत १४३ गुणांची कमाई करताना मुख्य फेरीत प्रवेश केला होता. मु्ख्य फेरीत त्याचे प्रयत्न चांगले होते. पण, हरियानाच्या मनिष नरवाल आणि राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांच्या अचूकतेचा त्याला सामना करता आला नाही. वैभवराजला २११.६ गुणांसह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. १० मीटर एअर रायफल प्रोन एसएच २ प्रकारात नरेंद्र देवप्रयाग गुप्ताला ६१०.९ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुष टेबल टेनिसपटूंची आगेकूच
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला ३ ते ४ पदकांची अपेक्षा असून, आज या मोहिमेला पुरुष खेळाडूंनी विजयी सुरुवा केली. अशोक कुमार पाल, दत्त प्रसाद चौगुले आणि विशाल तांबे यांनी पहिल्या फेरीत एकतर्फी विजय मिळविला. महिला विभागात पृथ्वी बर्वेलाच आगेकूच कायम राखता आली. नयना कांबळे आणि उर्मिला पाल यांना पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष गटात स्वप्निल शेळकेचा पराभव झाला.
टेबल टेनिस निकाल -
अशोक कुमार पाल वि. वि. सतिश राणा ११-२, ११-५, ११-५
दत्तप्रसाद चौगुले वि. वि, प्रितम साह (बंगाल) १४-१२, ११-८, ११-७
विश्वास तांबे वि. वि. पराशर हॅरी (उत्तर प्रदेश) ११-४, ११-२, ११-७
स्वप्निल शेळके पराभूत वि. अजय गव (कर्नाटक) ९-११, ७-११, २-११
भाविका कादिया (गुजरात)वि.वि. नयना कांबळे ११-२, ११-४, ११-३
पृथ्वी बर्वे वि.वि. शरण्या गोएल (राजस्थान) ११-९, ११-३, ११-३
उर्मिला पाल पराभूत वि. पूनम (चंडिगड) ३-११, ४-११, ५-११
पॉवरलिफ्टिंग खेळाडूंनीही दाखवली ताकद
ॲथलेटिक्स पाठोपाठ पॉवर वेटलिफ्टिंग प्रकारातही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या पदकांचा भार उचलला. पहिल्या दिवशी महाराष्ट्राने दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. पॉवरलिफ्टिंग प्रकारात महाराष्ट्राच्या पदकाची सुरुवात शुक्ला सतप्पा बिडकरने केली. तिने ४१ किलो वजन गटातून ५० किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. पंजाबची मनप्रीत कौर (८५ किलो) सुवर्ण, तर गुजरातची नयना पाबरी (४७) ब्राँझपदकाची मानकरी ठरली. त्यानंतर ४५ किलो वजनी गटात महाराष्ट्राची सोनम धोंडीराम पाटील ४० किलो वजन उचलून ब्राँझपदकाची मानकरी ठरली. पंजाबची जसप्रीत कौर (८५ किलो) आणि गुजरातची सपना शहा (४७ किलो) अनुक्रमे सुवर्ण, रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. महिलांच्या ५० किलो वजनी गटात महाराष्ट्राची प्रतिमाकुमारी बोंडे(८०किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. कर्नाटकाच्या सकिना खातूनने ९६ किलो वजन उचलताना सुवर्ण,तर उत्तर प्रदेशाच्या सायराने ब्राँझपदक मिळविले.