नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत (Khelo India Para Games 2023) जोरदार सुरुवात करताना सोमवारी ॲथलेटिक्स प्रकारात एक सुवर्ण आणि तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात महिलांच्या भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवने महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ॲथलेटिक्समधील अन्य क्रीडा प्रकारात दिलीप गावीत, गीता चव्हाण, शुभम सिंगनाथ यांनी आपापल्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
क्रीडा मंत्रालय आणि साईचा संयुक्त उपक्रमाचा भाग असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी शानदार सुरुवात केली. आरतीने सुवर्ण कामगिरी करताना एफ-३३/३४ प्रकारात १३.५७ मीटर भाला फेक केली. पुरुषांच्या टी ४७ प्रकारात नाशिकचा दिलीप गावित १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ११.४१ सेकंद वेळेसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. नागपूरच्या शुभम सिंगनाथने टी १२ या प्रकारातून १०० मीटर शर्यतीत १२.०१ सेकंद वेळ देताना रौप्यपदक मिळविले. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुंबईच्या गीता चव्हाणने टी ५३/५४ प्रकारात २४.८६ सेकंदासह रुपेरी यश मिळविले. अक्षय सुतार लांब उडीतील टी १३ प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने ५.२९ मीटर उडी मारली. ऋतुजा कौटाळेने २०० मीटर शर्यतीत टी ४७ प्रकारात ३१.५३ सेकंद वेळ देताना कांस्यपदक मिळविले.
विजयाने किताबाचा दावा मजबूत
आम्हाला स्पर्धेत कडवे आव्हान मिळेल असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात आम्ही सहज विजय मिळविले. यामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता पदकाची खात्री निश्चितपणे देऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांना आम्ही संधी मिळू दिली नाही. अचूक नियोजनामुळे आम्हाला ही कामगिरी शक्य झाली. आता सोनेरी यशासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून असे आरती पाटीलने सांगितले.
धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद - सुरेश काकड
पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप गावित, शुभम सिंगनाथ,भाग्यश्री जाधव, गीता चव्हाण यांनी पदार्पणात सुरेख कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय अनुभवाचा त्यांनी सुरेख फायदा करून घेतला. संघासाठी ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद ठरली, अशी प्रतिक्रिया संघाचे मुख्य प्रशिक्षक सुरेश काकड यांनी व्यक्त केली.