Khashaba Jadhav : भारताला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे 'पॉकेट डायनॅमो' पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या पुरस्काराबाबत येत्या 4 मे पूर्वी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, यामुळे खाशाबा जाधवांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Continues below advertisement

Khashaba Jadhav :  कोर्टाचा केंद्र सरकारला दणका

खाशाबा जाधव यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी 'कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन'च्या वतीने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला झापले असून 4 मे 2026 पूर्वी यावर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने खाशाबा जाधवांच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यास सांगितले आहे.

Khashaba Jadhav :  फाईल गहाळ ते कोर्टाची पायरी, रणजित जाधवांचा संघर्ष

खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला आहे. 2017 मध्ये खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण पुरस्काराची फाईल सरकार दरबारी गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने अखेर रणजित जाधव यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.

Continues below advertisement

Who is Khashaba Jadhav : कोण होते खाशाबा जाधव?

खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताचे नामांकित फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर या गावात झाला. त्यांचे वडील दादासाहेब हे ख्यातनाम पैलवान असून, ते तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देत असत. संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरी नियमितपणे कुस्तीचे डाव रंगत, आणि याच वातावरणात खाशाबा यांना कुस्तीचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून मिळाले.

पुढे उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले आणि त्यांनी राजाराम महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांचे कुस्तीचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही सक्रिय सहभाग घेतला.

1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट गटात कुस्ती खेळण्यासाठी त्यांची निवड झाली; मात्र या स्पर्धेत त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी हार न मानता 1952 च्या ऑलिम्पिकसाठी कठोर मेहनत घेतली. या वेळी 57 किलो वजन गटात त्यांची निवड झाली. आर्थिक अडचणींमुळे त्यांना ऑलिम्पिकला जाणे कठीण झाले होते, परंतु गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांना मदत केली.

1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सेमीफायनलपर्यंत मजल मारली. या प्रवासात त्यांनी जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. अखेरीस त्यांनी कांस्य पदक पटकावले. स्वतंत्र भारताला वैयक्तिक गटात मिळालेले हे पहिले ऑलिम्पिक पदक ठरले, ज्यामुळे देशाचा अभिमान उंचावला. अशा या महान कुस्तीपटूचे 14 ऑगस्ट 1984 रोजी निधन झाले.

आणखी वाचा 

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...