पुणे : पुणे वनडेमध्ये कोहलीच्या नेतृत्वात खेळला गेलेला पहिला सामना भारताने खिशात घातला. मात्र विराटला खंबीर साथ लाभली ती मराठमोळ्या केदार जाधवची. सर्वात जलद शतक ठोकणारा केदार हा सहावाच भारतीय फलंदाज ठरला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अवघ्या 13 वनडे सामन्यांचा अनुभव असतानाच त्याने ही मजल मारली आहे.

11 बॉल्स बाकी असतानाच विजय

पुण्याच्या वनडे सामन्यामध्ये साहेबांवर टीम इंडियाने दुहेरी हल्लाबोल केला. एकीकडे विराट कोहली तुफान फटकेबाजी करत होता, तर दुसरी कडे जाधवचा धमा'केदार' मारा सुरु होता. इंग्लंडने समोर ठेवलेल्या 351 धावांचा डोंगर पार केला तरी 11 बॉल शिल्लक राहिले होते.

विराट आणि केदारची शानदार शतकं

विराट कोहलीने 105 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकार ठोकत 122 धावा ठोकल्या. तर केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार लगावून 120 धावा रचल्या. केदारच्या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली.

वनडे मध्ये विराट कोहलीचं हे 27 वं शतक होतं, तर केदार जाधवचं हे दुसरंच! आश्चर्याची गोष्ट म्हणजे केदार फॉर्ममध्ये आला की शतकच ठोकतो. त्याने वनडेमध्ये आतापर्यंत फक्त शतकी खेळीच केली आहे. त्याच्या नावे एकही अर्धशतक नाही.

विराट-केदारची भागीदारी

पाचव्या विकेटसाठी विराट आणि केदारने दोनशे धावांची भागीदारी केली. केदारने अवघ्या 29 धावांत अर्धशतक पूर्ण केलं, तर 65 चेंडूंमध्ये शतकाचा उंबरठा ओलांडला. 158 च्या स्ट्राईक रेटने केदार खेळत होता. पायाच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे केदारला धावतानाही त्रास होत होता. अखेर 120 धावांवर तो झेलबाद झाला, मात्र टीम इंडियाचा विजय तोपर्यंत निश्चित झाला होता.

सामन्यानंतर कोहलीची स्तुतिसुमनं

मॅचनंतर कर्णधार कोहलीने केदार जाधववर स्तुतिसुमनं उधळली. केदारच्या शतकानंतर कोहलीने त्याला दिलेली कौतुकाची थाप प्रेक्षकांच्या कायमची स्मरणात राहील. 2019 च्या विश्वचषकासाठी मोहऱ्यांची जुळवाजुळव करताना कोहलीची केदार विशेष मेहेरनजर
असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

संबंधित बातम्या :


पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी


भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग