नवी दिल्ली: प्रो कब्बडीतील स्टार खेळाडू रोहित चिल्लरच्या 27 वर्षीय पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिल्लीतील नांगलोईमध्ये आपल्या माहेरी ललितानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 7.30च्या दरम्यान तिच्या वडिलांनी ललिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. सोबतच एक सुसाइड नोटही सापडली आहे.

रोहितसोबत असणाऱ्या तणावपूर्ण संबंधांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोटमध्ये असं लिहलं आहे की, तिला नाईलाजानं घरी एकटं राहावं लागत होतं आणि रोहितच्या वारंवार शहराबाहेर राहण्यानं ती व्यथित झाली होती. दरम्यान, आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप ललिताच्या माहेरच्यांनी केला आहे.

रोहित चिल्लर प्रो कब्बडी लीगच्या चौथ्या सीजनमध्ये बंगळुरु बुल्स आणि तिसऱ्या सीजनमध्ये पटना पायरेट्स संघात होता. ललितानं जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी रोहित मुंबईत होता.

रोहित आणि ललिताचं लग्न मागील वर्षी मार्चमध्ये झालं होतं. राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणारा रोहित स्पोर्ट्स कोटामधून नौसेनेत भरती झाला होता. चार वर्षापूर्वी त्याची कॉलेजमध्ये ललिताशी ओळख झाली होती. या घटनेनं ललिताच्या कुटुंबाला फारच मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या:

स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या