Joe Root : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याचे अनेक विक्रम विराट कोहलीने मोडीत काढले आहेत. इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज जो रूने सुद्धा आता सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावातील धावांचा विक्रम मोडित काढला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रूटने सर्वात मोठा विक्रम मोडला. इंग्लंडने हा सामना आठ गडी राखून जिंकला. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या डावात रूटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. इंग्लंडला विजयासाठी फक्त 104 धावांची गरज होती. जेकब बेथॉलने पहिला सामना खेळताना नाबाद 50 आणि रूटने नाबाद 23 धावा करत इंग्लंडला विजयाकडे नेले. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.






कसोटी सामन्यात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज


आपल्या 23 धावांच्या खेळीने रूटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटी सामन्यात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. रूट त्याची 150 वी कसोटी खेळत होता. आता चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो नंबर-1 बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिनने कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात 1625 धावा केल्या आहेत. रुटच्या नावावर आता 1630 धावा झाल्या आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ 1611 धावांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.


इंग्लंडचा मोठा विजय


रूटला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. मात्र दुसऱ्या डावात कमी धावा करूनही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात इंग्लंड संघाने यजमानांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 348 धावा करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या आणि 151 धावांची आघाडी घेतली. यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 254 धावा केल्या आणि इंग्लंडला 104 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी सहज गाठले.


इतर महत्वाच्या बातम्या