Jasprit Bumrah Player of the Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेटने जिंकला. सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन जसप्रीत बुमराहच्या पाठीत दुखापत झाली, त्यानंतर तो दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. त्यामुळे निर्णायक क्षणी त्याला गोलंदाजी करता आली नसल्याची खंत पराभवानंतर व्यक्त केली. टीम इंडियाने मालिका गमावली असली, तरी मालिकेत धारदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला घाम फोडलेल्या बुमराहला मालिकावीर घोषित करण्यात आले. संपूर्ण दौऱ्यात बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया असाच सामना रंगला. यशस्वी जैस्वाल आणि नितीश रेड्डीचा काहीसा अपवाद वगळता इतरांकडून साफ निराशा झाली. विराट आणि रोहित संपूर्ण मालिकेत अपयशी ठरले.
जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द सिरीज होताच म्हणाला की, बरीच निराशा झाली, पण कधी कधी तुम्हाला तुमच्या शरीराचा आदर करावा लागतो, तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. कदाचित मालिकेतील सर्वात मसालेदार विकेट हुकली. पहिल्या डावात त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये थोडं अस्वस्थ वाटलं. इतर गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. एक गोलंदाज कमी असल्याने इतरांना जबाबदारी घ्यावी लागली. आज सकाळी आम्ही त्याच अनुषंगाने बोललो होतो. क्षमतेवर विश्वास ठेवण्याबद्दल आणि आपला खेळ दाखवण्याबद्दल चर्चा झाली, पण संपूर्ण मालिका खडतर होती, आम्ही अजूनही खेळात होतो, असे नाही की आम्ही त्यातून बाहेर पडलो, कसोटी क्रिकेट असेच चालते.
खेळात जास्त वेळ टिकून राहणे, दबाव आणणे, दबाव हाताळणे आणि परिस्थितीनुसार खेळणे हे सर्व महत्त्वाचे आहे. तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि हे धडे आम्हाला भविष्यात मदत करतील. त्यांनी (तरुणांनी) खूप अनुभव घेतला आहे, ते अधिक मजबूत होतील. आमच्याकडे खूप प्रतिभा आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. बरेच युवा खेळाडू उत्सुक आहेत, आम्ही जिंकलो नाही म्हणून ते निराश आहेत, पण या अनुभवातून ते शिकतील. ही एक उत्तम मालिका होती, ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन, त्यांनी खरोखरच चांगली लढत दिली.
इतर महत्वाच्या बातम्या