मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं जमैका कसोटीच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 196 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
जमैकाच्या सबिना पार्कवर पाहुण्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात यजमानच उताणे पडावेत अशीच काहीशी अवस्था विंडीजची झाली. या कसोटीसाठी विंडीजनं वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरावी अशी खेळपट्टी बनवून घेतली होती. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीचं आमंत्रण देणार असं सोपं समीकरण दिसत होतं. पण विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून चक्क फलंदाजी स्वीकारली आणि त्याचे परिणाम विंडीजला भोगावे लागले.
अँटिगा कसोटीप्रमाणे जमैका कसोटीतही विंडीज फलंदाज भारतीय आक्रमणासमोर टिकाव धरु शकले नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजचा अख्खा डाव अवघ्या 196 धावांत आटोपला. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं अवघ्या सात धावांतच आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून विंडीजचं कंबरडं मोडलं होतं. पण त्यानंतर मार्लन सॅम्युअल्स आणि जर्मेन ब्लॅकवूडनं चौथ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
जर्मेन ब्लॅकवूडनं 62 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह 62 धावांची खेळी रचली. तर मार्लन सॅम्युअल्सनं 37 धावांची खेळी उभारली. मात्र अँटिगा कसोटीतला मॅचविनर रविचंद्रन अश्विननं दोघांचाही काटा काढून विंडीजला पुन्हा दणका दिला.
अश्विननं केवळ ब्लॅकवूड आणि सॅम्युअल्सचाच काटा काढला नाही तर 16 षटकांत 52 धावांच्या मोबदल्यात विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडलं. अश्विननं आपल्या कसोटी कारकीर्दीतल्या 34 सामन्यांमध्ये तब्बल अठरा वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.
इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनंही विंडीजच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपण पार पाडल्यानंतर फलंदाजांनीही निराशा केली नाही. लोकेश राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर एक बाद 126 धावांची मजल मारली.
लोकेश राहुलनं 114 चेंडूत दहा चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. अँटिगा कसोटीत 84 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला मात्र आपला फॉर्म टिकवता आला नाही. धवन अवघ्या 27 धावांवर माघारी परतला. पण धवननं लोकेश राहुलच्या साथीनं 87 धावांची सलामी दिली.
आता जमैका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लोकेश राहुलला कसोटी कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावून टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून देण्याची संधी आहे.