कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.


27 वर्षीय इशांतला चिकनगुनिया झाला असून तो अद्याप यातून पूर्णत: बरा झालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कानपूर कसोटी हा भारताचा 500 वा कसोटी सामना असेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.

इशांतच्या जागी अजून कोणाच्याही नावाची चर्चा नाही. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

राजधानी दिल्लीमध्ये चिकनगुनियाने थैमान घातलं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 1000 नागरिकांना चिकनगुनिया झाला आहे. 2011 पासून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 2011 मध्ये 107 जणांना चिकनगुनिया झाला होता.