कोलकाता: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला.


ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मोठ्या धावसंख्येचं आव्हान आणि प्ले ऑफची तीव्र चुरस यांच्या दडपणाखाली कोलकात्याचा अख्खा संघ अवघ्या 108 धावांत गडगडला.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून तब्बल 16 चौकार आणि 14 षटकारांची वसुली केली. त्यामुळं मुंबईला वीस षटकांत सहा बाद 210 धावांची मजल मारता आली.

ईशान किशनचा धमाका

मुंबईच्या प्रतिहल्ल्यात यष्टिरक्षक ईशान किशननं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं अवघ्या 17 चेंडूंतच आपलं अर्धशतक साजरं केलं. ईशान किशननं 21 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

किशनने येईल तो चेंडू सीमापार धाडला. त्यामुळे कोलकात्याच्या गोलंदाजांना त्याला नेमकी कशी गोलंदाजी करावी हेच कळत नव्हतं.

ज्यावेळी मुंबई इंडियन्सची स्थिती 9 षटकात 2 बाद 62 अशी होती, त्यावेळी ईशान किशन मैदानात उतरला. आल्या आल्याच त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.



कुलदीप यादव आणि पियुष चावला यांना त्याने 1 सिक्स आणि 3 चौकार ठोकले. ईशान किशन 9 चेंडूत 21 धावा ठोकल्या, त्यावेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या हिटमॅन रोहित शर्माकडे कुणाचं लक्ष नव्हतं.

किशनने कुलदीप यादवने टाकलेल्या 14 व्या षटकात चांगलीच धुलाई केली. त्याने चारवेळा चेंडू सीमेपल्याड धाडला आणि अवघ्या 17 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

किशनने नंतर आणखी दोन सिक्स ठोकले. मात्र सातवा सिक्स मारण्याच्या नादात तो सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाकरवी झेलबाद झाला.

मात्र तोपर्यंत ईशानने त्याचं काम केलं होतं. अवघ्या 21 चेंडूत ने 62 धावा करत, मुंबईला अवघ्या 5.4 षटकात 82 धावा लुटून दिल्या होत्या.

दुसरीकडे सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं प्रत्येकी 36 धावांची खेळी उभारली. बेन कटिंग 24, हार्दिक पंड्यानं 19 आणि एविन लुईसनं 18 धावांची खेळी केली.

ईशान किशनची इनिंग

0 6 1 4 0 0 4 2 4 1 1 4 1 4 6 6 6 6 0 6 W

21 चेंडूत 62 धावा 


मुंबई चौथ्या स्थानी

मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला.

मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यात समसमान दहा गुण आहेत. पण मुंबईनं कोलकात्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट उंचावला. त्याच वेळी या पराभवानं कोलकात्याचा नेट रनरेट ढासळला. त्यामुळं मुंबईला गुणतालिकेत चौथं स्थान मिळवता आलं.

सध्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद 16 गुणांसह पहिल्या, चेन्नई सुपर किंग्ज 14 गुणांसह दुसऱ्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या
मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, केकेआरचा 102 धावांनी पराभव