पुणे : वर्ल्डकपच्या इतिहासात सलग आठव्यांदा पाकिस्तानला टीम इंडियाने अहमदाबादच्या मैदानात चित केले होते. या सामन्यानंतर आठवडा उलटला तरी विविध कारणांची मालिका सादर करत पाकिस्तानी संघाकडून रडीचा डाव सुरुच आहे. भारतासोबत झालेल्या सामन्यात अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी पत्रकार आणि चाहत्यांसाठी व्हिसा धोरणावरून तक्रार केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि वर्ल्डकपमध्ये समालोचन करत असलेल्या इरफान पठाणने पाकिस्तान दौऱ्यातील भयावह अनुभव सांगत पाकिस्तानच्या रडीच्या डावावरून चांगलेच फटकारले आहे.
आम्ही कधी मुद्दा केला नाही
इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, आम्ही पाकिस्तान दौऱ्यात पेशावरमध्ये खेळत होतो. त्यावेळी एका चाहत्याने अचानक माझ्यावर लोखंडी खिळे फेकले जे माझ्या डोळ्याखाली आले. मात्र, आम्ही कधीच यातून मुद्दा काढला नाही आणि त्यांच्या आदरातिथ्याचे नेहमीच कौतुक केले. त्यामुळे भारतातील चाहत्यांच्या वर्तनावर प्रश्न निर्माण करणे पाकिस्तानने थांबवावे.
दुसरीकडे, नरेंद्र मोदी स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या वर्तणुकीवरून वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला नाणेफेकीवेळी अहमदाबादच्या प्रेक्षकांचा सामना करावा लागला. त्यानंतर, पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी भलतेच वक्तव्य केले. ते म्हणाले की, स्पर्धा आयसीसीपेक्षा बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) कार्यक्रमासारखी वाटते. पाकिस्तान चाहत्यांच्या अनुपस्थितीचे कारण देत त्यांनी हे वक्तव्य केले होते.
दरम्यान, पीसीबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात उशीर झाल्याबद्दल आणि चालू स्पर्धेत चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब आणि चालू विश्वचषक 2023 साठी पाकिस्तानी चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे आणखी एक निषेध नोंदवला आहे. पीसीबीने अनुचित वर्तनाबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूरमध्ये होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या