Virat Kohli Shreyas Iyer PBKS Vs RCB IPL 2025 : कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा यांच्या गोलंदाजी आणि त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या अर्धशतकांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) इंडियन प्रीमियर लीगमध्ये एका एकतर्फी सामन्यात पंजाब किंग्जचा सात विकेट्सने पराभव केला. पंजाबच्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहली (नाबाद 54 चेंडू 73 धावा, 7 चौकार, 1 षटकार) आणि देवदत्त पडिक्कल (35 चेंडू, 61 धावा, 4 षटकार, 5 चौकार) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 7 चेंडू शिल्लक असताना तीन विकेटच्या मोबदल्यात 159 धावा करून सहज विजय मिळवला. सामन्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला खूप चिडवले.

विराट कोहलीने श्रेयस अय्यरला चिडवलं...

आरसीबीच्या डावातील 19 वे षटक पंजाब किंग्जच्या नेहल वधेराने टाकले. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, जितेश शर्माने षटकार मारला आणि त्याच्या संघाला सामना जिंकून दिला. जितेशने षटकार मारताच, नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने श्रेयस अय्यरकडे पाहून सेलिब्रेशन केले आणि त्याला चिडवले.

पण, अय्यरला कोहलीचे ते सेलिब्रेशन आवडले नाही, आणि तो भडकला. जेव्हा अय्यर कोहलीशी हस्तांदोलन करण्यासाठी आला, तेव्हा तो थोडा नाराज दिसत होता. पण त्यानंतर तो हसायला लागला. या हंगामात आरसीबीचा हा पाचवा विजय होता. त्याचे आता 10 गुण आहेत. तो पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

या हंगामात कोहली तुफान फॉर्ममध्ये....

या हंगामात कोहली उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये 140 च्या स्ट्राईक रेटने आणि 64.40 च्या सरासरीने 322 धावा केल्या आहेत. या हंगामात लक्ष्यांचा पाठलाग करताना कोहलीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 59*, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 62* आणि पंजाबविरुद्ध नाबाद 73 धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या पाच डावांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 59, 77, 92, 1 आणि 73 नाबाद धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 

या हंगामात कोहली त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. तो सध्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या पुढे लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन (368 धावा) आणि गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन (365 धावा) आहेत. 315 धावांसह जोस बटलर आणि 307 धावांसह यशस्वी जैस्वाल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा -

Amit Mishra Wife News : विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी छळ अन् मारहाण; मोहम्मद शमीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या बायकोचे सनसनाटी आरोप