अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला आहे. आरसीबीनं 9 विकेटनं गुजरात टायटन्सला (Gujarat Titans ) पराभूत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सनं विजयासाठी दिलेलं आव्हान 16 ओव्हरमध्ये पार केलं. गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या. आरसीबीनं विराट कोहली (Virat Kohli) आणि विल जॅक्सच्या (Will Jacks) वादळी खेळीच्या जोरावर 16 ओव्हरमध्येच विजय मिळवला. विल जॅक्सनं 41 बॉलमध्ये 100 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. आरसीबीनं सलग दुसरा विजय मिळवल्यानं विराट कोहली आनंदी दिसून आला. विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतर विल जॅक्सच्या खेळीबद्दल आनंद व्यक्त केला तर त्याचवेळी स्ट्राइक रेटवरुन टीका करणाऱ्या टीकाकारांना देखील त्यानं प्रत्युत्तर दिलं.
विल जॅक्सच्या शतकाचं जंगी सेलिब्रेशन
विराट कोहली आणि विल जॅक्सनं आरसीबीला 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. आरसीबीला विजयासाठी एका रनची आवश्यकता असताना विल जॅक्स 94 धावांवर होता. विराट कोहली त्यावेळी नॉन स्ट्राइकर एंडला होता. विल जॅक्सनं सिक्स मारतं शतक पूर्ण केलं आणि आरसीबीला 16 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला. विराट कोहलीसाठी हा क्षण दुहेरी आनंद देणारा होता. आरसीबीनं स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला होता, त्याच बरोबर विल जॅक्सचं शतक देखील झालं होतं. विल जॅक्सची खेळी नॉन स्ट्राइकर एंडला पाहणं आनंददायी असल्याचं कोहली म्हणाला.
पाहा व्हिडीओ
विराट कोहलीचं टीकाकारांना प्रत्युत्तर
विराट कोहलीनं त्याच्या स्ट्राइक रेटवरुन टीका करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. स्ट्राइक रेटवरुन आणि स्पिन बॉलिंगला नीट खेळत नाही यावरुन बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते लोक फक्त आकड्यांबाबत बोलतात, मी माझं काम करतोय. आम्ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. गेल्या 15 वर्षांपासून हेच करत आलोय. माझ्या संघासाठी मॅच जिंकत आलोय. तुम्ही मैदानाबाहेर बसून मॅचसंदर्भात बोलणं आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळणं यात फरक असतो, असं विराट कोहली म्हणाला.
विराट कोहलीच्या 500 धावा पूर्ण
विराट कोहलीनं गुजरात टायटन्स विरुद्ध 70 धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये 500 धावा केल्या. विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 धावा केल्य यामध्ये त्यानं 3 सिक्स आणि चार चौकार मारले.
संबंधित बातम्या