IPL 2022: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती समोर आल्यानंतर क्रिडाविश्वात खळबळ माजली. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांत झळकत आहे. या वृत्तावर महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवाद्याचं संकट नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली नसून कोणत्याच दहशतवाद्यांनी ट्रायडेंट किंवा वानखेडेची रेकी केली नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे. आयपीएल ही स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, अशी माहिती समोर आली. यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली. परंतु, अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंटच ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपूट किंवा माहिती प्राप्त झालेली नाहीये, असं मुंबई पोलिसांनी आपल्या पत्रकात म्हटलंय. 


प्रसारमाध्यमांत झळकत असलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडं चौकशी केली असता त्यानं वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली. त्यानंतर हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आलीय. खेळाडूंसह सामनाधिकारी, पंच आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच पुढील धोका लक्षात घेता बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले, असंही सांगण्यात आलं होतं. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगाम 26 तारखेपासून सुरु होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार आहे. मुंबईच्या तीन स्डेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 20 सामने वानखेडे स्डेडियमवर खेळले जातील. तर, ब्रेबॉन स्डेडियममध्ये 15 आणि डीव्हाय स्डेडियमवर 20 सामने खेळले जाणार आहे. इतर 15 सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्डेडियमवर होतील. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha