Royal Challengers Bangalore VS Chennai Super Kings IPL 2025 : विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांनंतर तगड्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये आपली विजयाची मालिका सुरू ठेवली. आरसीबीने आधी खेळताना 213 धावा केल्या, ज्यानंतर चेन्नईचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 211 धावा करू शकला. यासह, आरसीबीने आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. 17 वर्षीय आयुष म्हात्रेने या सामन्यात 94 धावांची खेळी खेळली, तर रवींद्र जडेजाच्या नाबाद 77 धावा देखील व्यर्थ गेल्या.

बंगळुरूमध्ये विराट कोहली आणि बेथेल नावाचं वादळ  

आधी फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात पण तुफानी झाली. कारण विराट कोहली आणि बेथेल या दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आरसीबीला पहिला धक्का दहाव्या षटकात बसला, जेव्हा वादळी अर्धशतक ठोकून बेथेल आऊट झाला. बेथेलने 33 चेंडूत 55 धावा केल्या. पण यानंतर, विराट कोहलीने संघाची धुरा हातात घेतली आणि 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण सॅम करनने बाराव्या षटकात त्याची विकेट घेतली. कोहलीने 33 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली. यानंतर, देवदत्त पडिक्कल देखील 16 व्या षटकात आऊट झाला. त्याने 17 धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारही काही खास करू शकला नाही आणि फक्त 11 धावा करून आऊट झाला.

रोमारियो शेफर्डची तुफानी खेळी! खलील अहमदच्या 6 चेंडूत ठोकल्या 33 धावा 

ज्यामुळे आरसीबीची अवस्था 18 षटकांत 5 बाद 159 अशी झाली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी खलील अहमदला चेंडू दिला. रोमारियो शेफर्डने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून खळबळ उडवून दिली. यानंतरही त्याने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर आणखी एक गगनाला भिडणारा षटकार मारला. खलील अहमदला काय करावे हे समजत नव्हते. ज्यामुळे तो लाईन लेंथही विसरला आणि नो बॉल टाकला. या चेंडूवर रोमारियो शेफर्डनेही षटकार मारला, ज्यामुळे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना आनंद करण्याची संधी मिळाली. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला आणि अशा प्रकारे या षटकात 33 धावा केल्या. शेफर्डने 14 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी खेळली. या आधारावर आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य दिले.

सीएसकेची तुफानी सुरुवात  

214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली. आयुष म्हात्रे आणि रशीद यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. पण पाचव्या षटकात 51 धावांवर असताना सीएसकेला पहिला धक्का बसला, जेव्हा रशीद 14 धावा करून बाद झाला. सहाव्या षटकात सॅम करन देखील 5 धावा काढून आऊट झाला.

आयुष म्हात्रे चमकला! ठोकल्या 94 धावा

पण यानंतर आयुष म्हात्रेने संघाची सुत्र हातात घेतली आणि 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच वेळी, रवींद्र जडेजानेही त्याला साथ दिली. दोघांमध्ये शतकी भागीदारीही झाली. जडेजानेही 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर, दोघांनी तुफानी फटकेबाजी करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. दोघांमध्ये 114 धावांची भागीदारी झाली. पण 17 व्या षटकात आयुष म्हात्रेची विकेट पडली. आयुषने 94 धावांची खेळी खेळली. आयुषने त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले.

यश दयालच्या रोमांचक षटकात आरसीबीचा विजय

शेवटच्या षटकात सीएसकेला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूंवर एक धाव आली, पण नंतर यश दयालने तिसऱ्या चेंडूवर धोनीला एलबीडब्ल्यू आउट केले. एमएस धोनी पुन्हा एकदा अपयशी ठरला, आणि 12 धावा करून आऊट झाला. चौथ्या चेंडूला नो-बॉल होता आला, ज्यावर शिवम दुबेने षटकार मारून सामना सीएसकेच्या बाजूने आणला, परंतु शेवटच्या 2 चेंडूंमध्ये सामना परत फिरला. यश दयालने शेवटच्या 2 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या, ज्यामुळे आरसीबीला 2 धावांनी रोमांचक विजय मिळाला.