Robin Uthappa On IPL Salary : आयपीएल 2024 आधी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क कोट्यधीश झाला. मिचेल स्टार्कला कोलकात्यानं तब्बल 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर हौदाराबाद संघाने 20.5 कोटींचा डाव खेळला. पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. याच आयपीएल लिलाव आणि खेळाडूंच्या किंमतीबद्दल सीएसकेचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पानं मोठं वक्तव्य केलेय. त्याचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला लिलावात 100 कोटी मिळाले असते, असा दावा उथप्पानं केला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, आयपीएल लिलावाबाबत बोलायचं झाल्यास  जर सॅलरी कॅप नसती तर कमीत कमी 10 भारतीय खेळाडूंना 100 कोटी रुपये मिळाले असते.


'जसप्रीत बुमराहशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्माला..100 कोटी'


सध्या आयपीएल संघ लिललावात जास्तीत जास्त 100 कोटी रुपये खर्च करु शकतात. रॉबिन उथप्पा म्हणाला की, ' जर आयपीएल लिलावात सॅलरी कॅप नसती अथवा सॅलरी कॅप 1000 कोटी अथवा 500 कोटी असती, तर कमीत कमी 10 भारतीय खेळाडूंना 100 कोटी किंवा जास्त रक्कम मिळाली असती.  जसप्रीत बुमराहशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंना कमीतकमी 100 कोटी रुपये मिळाले असते.' 


'हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांना नक्कीच 80 ते 100 कोटी रुपये मिळाले असते. त्याशिवाय शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांच्यासारख्या युवा खेळाडूंवरही 100 कोटींची बोली लागली असती, असे उथप्पा म्हणाला.'






कोणत्या संघाकडून खेळला रॉबिन उथप्पा - 


भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा आयपीएलमध्ये पाच संघाकडून खेळला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघाचा सदस्य राहिलाय. रॉबिन उथप्पानं आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. रॉबिन उथप्पानं 205 आयपीएल सामने खेळले आहेत. उथप्पानं 197 आयपीएल डावात 4952 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 27 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने 182 षटकार आणि 481 चौकार ठोकले आहेत. 2007  टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा रॉबिन उथप्पा सदस्य राहिला आहे.  


22 मार्चपासून आयपीएलचा थरार - 


आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार आठ दिवसानंतर सुरु होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल (IPL 2024) स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (CSK vs RCB) सलामीची लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे.