RCB vs SRH  : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण आरसीबीच्या गोलंदाजांनी निराशा केली. लॉकी फर्गुसन, रीस टॉप्ली आणि यश दयाल यांना भेदक मारा करता आला नाही. हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी पहिल्या सहा षटकांमध्येच 76 धावांचा पाऊस पाडला. पहिल्या चेंडूपासूनच हैदराबादच्या फलंदाजांनी हल्लाबोल केला. आरसीबीसाठी आजचा सामना महत्वाचा आहे, पण हैदराबादची फलंदाजी पाहाता सामना हातातून निसटू शकतो. 


विल जॅक्सचा भेदक मारा - 


पॉवरप्लेमध्ये विल जॅक्स यानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. विल जॅक्स यानं गोलंदाजीनं डावाची सुरुवात केली. त्यानं दोन षटकांमध्ये फक्त 11 धावा दिल्या. पण पॉवरप्ले संपल्यानंतर घेऊन आलेलल्या आपल्या तिसऱ्या षटकात त्याला चांगला मार बसला.  ट्रेविस हेड यानं विल जॅक्सचा समाचार घेतला. 



लॉकी फर्गुसनला चोपला, टोप्लीला धुतलं - 


लॉकी फर्गुसन यानं आरसीबीकडून आज पदार्पण केले. पण पहिल्याच सामन्यात त्याला सपाटून मार बसला. हैदराबादच्या फलंदाजांनी त्याचा खरपूस समाचार घेतला.  लॉकी फर्गुसनच्या एकाच षटकात 18 धावा वसूल केल्या. फर्गुसन याच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार वसूल केला. 


रीस टोप्ली यालाही प्रभावी मारा करता आला नाही.  टोप्ली यानं एका षटकात 20 धावा खर्च केल्या. त्यालाही दोन षटकार लगावले. 


यश दयाल यानं पहिलं षटक चांगलं टाकलं, पण दुसऱ्या षटकात मात्र मार बसला. यश दयाल याला दोन षटकामध्ये 27 धावा निघाल्या. 







ट्रेविस हेडचा झंझावत - 


हैदराबादचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड यानं स्फोटक फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. हेड यानं अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. बातमी लिहीपर्यंत ट्रेविस हेड यानं अवघ्या 26 चेंडूमध्ये 70 धावा वसूल केल्या होत्या. यामध्ये सात षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. युवा अभिषेक शर्मानं ट्रेविस हेडला चांगली साथ दिली. अभिषेक शर्मानं 20 चेंडूमध्ये 33 धावा केल्या. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकाराचा समावेश आहे. आठ षटकानंतर हैदराबादने बिनबाद 108 धावा केल्या आहेत.