RCB vs PBKS IPL 2024 Updates : विराट कोहलीचं (Virat Kohli) शानदार अर्धशतक, दिनेश कार्तिक (Dinesh kartik) आणि महिपाल लोमरोर यांचा फिनिशिंग टच याच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा (RCB vs PBKS) 4 विकेटनं पराभव केला. पंजाबने दिलेले 177 धावांचे आव्हान आरसीबीने (RCB) चार चेंडू आणि चार विकेट राखून पार केले. आरसीबीने (RCB) यंदाच्या हंगमातील पहिला विजय नोंदवला. तर पंजाबचा पहिलाच पराभव झाला. 


बुरा ना मानो कोहली है... 


विराट कोहीलने पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करताना शानदार खेळी केली. विराट कोहलीने 49 चेंडूमध्ये 77 धावांचं महत्वाचं योगदान दिले. विराट कोहलीने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि 11 चौकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना विराट कोहलीने दुसऱ्या बाजूने धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहलीच्या खेळीच्या बळावर आरसीबी विजयाच्या द्वारात पोहचला. दिनेश कार्तिकनं विजयावर शिक्कामोर्तब केले.






आरसीबीचे दिग्गज फ्लॉप - 


177 धावांचा सुरुवात करताना आरसीबीच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार फाफ डु प्लेसिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत आणि रजत पाटीदार यांना मोठी खेळी करता आली नाही. फाफ डु प्लेलिस फक्त तीन धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलही फक्त तीन तीन धावा काढून तंबूत परतले. रजत पाटीदार याला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाटीदार 18 चेंडूत 18 धावांची संथ खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. अनुज रावत यानेही संथ फलंदाजी केली. रावत याने 14 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने फक्त 11 धावा केल्या. 


कार्तिक-लोमरोर यांची विजयी फिनिशिंग - 


विराट कोहली आणि अनुज रावत लागोपाठ बाद झाल्यामुळे आरसीबीचा संघ अडचणीत सापडला होता. पंजाबने सामन्यात कमबॅक केले होते. पण दिनेश कार्तिक आणि लोमरोर यांनी शानदार फलंदाजी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. कार्तिक आणि लोमरोर यांनी सातव्या विकेटसाठी 18 चेंडूमद्ये 48 धावांची भागिदारी केली. लोमरोर यानं 8 चेंडूत 17 धावांचं योगदान दिले तर दिनेश कार्तिकने 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिले. दिनेश कार्तिकच्या खेळीला दोन षटकार आणि तीन चौकारांचा साज होता. तर महिपाल लोमरोर यानं दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 महत्वाच्या धावा केल्या.






पंजाबची गोलंदाजी कशी राहिली ?


पंजाबकडून हरप्रीत ब्रार यानं भेदक मारा केला. हरप्रीत ब्रार यानं सामना पंजाबच्या बाजूने झुकवला होता. त्यानं चार षटकात फक्त 13 धावा देत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय कगिसो रबाडा यानं चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. सॅम करन आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल महागडे ठरले, त्याशिवाय राहुल चाहरही महागडा ठरला.