Bangalore vs Mumbai: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला 166 धावांचे लक्ष्य दिलं आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने 51 आणि ग्लेन मॅक्सवेलने 56 धावा केल्या. या दोघांशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने 32 धावा केल्या. त्याचबरोबर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.


तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराबी झाली. सलामीवीर देवदत्त पडीकल दुसऱ्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. यानंतर कोहली आणि भरत यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. 24 चेंडूत 32 धावा केल्यावर भरत बाद झाला. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले.


यानंतर कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आरसीबीचा डाव पुढे नेला. दोघांनीही मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. एकेवेळ अशी होती की आरसीबी सहज 180-190 धावा करेल असे वाटत होते. पण, शेवटच्या षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या आणि त्यांना 165 धावांवर रोखले.


भरत 75 धावांवर बाद झाल्यानंतर कोहली आणि मॅक्सवेलने तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. आरसीबीची धावसंख्या 15 षटकांत 120 च्या पुढे होती. पण 16 व्या षटकात कोहली 51 धावांवर बाद झाला. त्याने 42 चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. यानंतर फलंदाजीसाठी आलेला एबी डिव्हिलियर्स काही खास करू शकला नाही.


19 व्या षटकात जसप्रीत बुमराहने पहिल्यांदा मॅक्सवेल (37 चेंडू 56 धावा) आणि नंतर एबी डिव्हिलियर्सला (6 चेंडूत 11 धावा) बाद केले. यानंतर 20 व्या षटकात बोल्टने शाहबाजला (01) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिलने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.