मुंबई : तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ संपवून बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. पंजाब किंग्जचा पराभव करून विराट कोहलीच्या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झालंच, पण त्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाचेही स्वप्न पू्र्ण झालं. काही वर्षापूर्वी तिने आरसीबी आयपीएल जिंकायला हवी असं म्हणत 'ई साला कप नामदे' असा डॉयलॉग मारला होता. तो आता सत्यात उतरला आहे.

ई साला कप नामदे... या वर्षी आयपीएलची ट्रॉपी आमचीच असं रश्मिका मंदानाने म्हटलं होतं आणि बंगळुरूला पाठिंबा दिला होता. त्यानंतर तिचा हाच डॉयलॉग प्रत्येक आयपीएलमध्ये व्हायरल होत होता. यंदाच्या आयपीएलमध्येही हा डॉयलॉग बंगळुरूच्या प्रत्येक फॅनच्या तोंडी होता. गेल्या 18 वर्षांपासून आयपीएलची ट्रॉपी जिंकण्याचं बंगळुरूचं स्वप्न यंदा सत्यात उतरलं आणि रश्मिकाचा डॉयलॉगही सत्यात उतरला. 

विराटची स्वप्नपूर्ती अन् बंगळुरूचा विजय

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेेतेपद पटकावलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.

या विजयासह बंगळुरुचं आणि या संघाचा गेली 18 वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं. कृणाल पंड्याने 4 षटकांत अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमारियो शेफर्डने श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी कोहलीच्या 35 चेंडूंमधील 43 तर रजत पाटीदारच्या 16 चेंडूंमधील 26 धावांच्या खेळींनी आरसीबीच्या 190 च्या धावसंख्येत महत्त्वाचं योगदान दिलं.