RR vs GT Playing XI, Pitch Report & Match Prediction : आयपीएलचा 17 वा हंगाम आता रंजक होत चालला आहे. मंगळवारी रोमांचक सामन्यात हैदराबादने पंजाबचा दोन धावांनी पराभव केला. आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर दोन्ही संघाची लढत होईल. संजू सॅमसनचा विजयरथ शुभमन गिल रोखणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागले आहे. राजस्थानचा संघ स्पर्धेत अजेय आहे, त्यांनी आतापर्यंत चारही सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे शुभमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात संघ पाच सामन्यात चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यासाठी गुजरात आणि राजस्थानची प्लेईंग 11 कशी असेल? पिच रिपोर्ट काय सांगतो ? यासंदर्भात जाणून घेऊयात...
राजस्थानच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार ?
राजस्थान रॉयल्स संघ स्पर्धेत अजेय आहे, आतापर्यंत चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये बदल होम्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर हेच सलामीला उतरतील. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल तर चहल आणि अश्विन फिरकीची धुरा संभाळतील.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 -
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकिटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांन्द्रे बर्गर, अवेश खान आणि युजवेंद्र चहल
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11 -
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विलियमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, दर्शन नाळकंडे, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन आणि नूर अहमद.
जयपूरमध्ये गोलंदाजांना मदत मिळणार ?
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक मानली जात आहे. हे मैदानात मोठं असल्यामुळे चौकार-षटकार मारणं तितकं सोप्प नसेल. मैदानाचा व्यावस्थित वापर केल्यास फिरकी गोलंदाजीही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. दव हा महत्वाचा फॅक्टर ठरतो. त्यामुळे धावांचा पाठलाग करणारा संघाला विजयाची शक्यता जास्त आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 161 इतकी आहे.
कोणाचं पारड जड ?
आयपीएलच्या 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचं प्रदर्शन शानदार राहिले आहे. आतापर्यंत हा संघ अजेय आहे. गोलंदाजांशिवाय फलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. यशस्वी जायस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. संजू सॅमसन, जोस बटलर आणि रियान पराग भन्नाट फॉर्मात आहे. दुसरीकडे गुजरातचा संघही संतुलीत आहे. आकडे पाहिल्यास गुजरातचे पारडे जड मानले जातेय. गुजरात आणि राजस्थान संघाचा आतापर्यंत पाच वेळा आमनासामना झाला. त्यामधील चार सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. तर फक्त एका सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थानने बाजी मारली. आजच्या सामन्यात राजस्थानचं पारडं जड दिसत असले तर आकडे गुजरातच्या बाजूने आहेत.