Vaibhav Suryavanshi Century Rahul Dravid Celebration : सोमवारी वैभव सूर्यवंशी त्याचा फक्त तिसरा आयपीएल सामना खेळत होता, त्या दरम्यान त्याने असा विक्रम केला जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. एवढेच नाही तर भविष्यातही वैभवचा हा विक्रम मोडणे कोणालाही जवळजवळ अशक्य आहे. त्याने स्फोटक फलंदाजी केली आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यासह वैभव आता आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही बनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची धुलाई...
आयपीएल 2025 चा 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये आरआरने 8 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने 11 व्या षटकातच आपले शतक पूर्ण केले. गुजरात टायटन्सचे मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, करीम जनात आणि प्रसीद्ध कृष्णासारखे स्टार गोलंदाज फेल ठरले. सगळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात पण तरीही वैभवसमोर ते काहीही करू शकले नाहीत.
व्हीलचेअरवरून फिरणारा राहुल द्रविड उभा राहून नाचू लागला!
एकीकडे हे वादळी शतक पाहून संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं, तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील त्याच्या व्हीलचेअरवरून उभा राहिला आणि नाचू लागला. आयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये व्हीलचेअरवर दिसला. पण वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरून आनंदाने उड्या मारू लागला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने केले मोठे विक्रम
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. त्याने फक्त 35 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या पुढे ख्रिस गेल आहे, ज्याने 30 चेंडूत ही कामगिरी केली. याशिवाय, वैभव सर्वात जलद शतक करणारा पहिला भारतीय फलंदाजही ठरला. एवढेच नाही तर तो आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही बनला आहे. त्याच वेळी, वैभवने षटकार मारण्यातही सर्वांना मागे टाकले. त्याने त्याच्या डावात एकूण 11 षटकार मारले. त्यानंतर सूर्यवंशी टी-20 डावात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला. या प्रकरणात त्याने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरलाही मागे टाकले.
