Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : विजयाची मालिका सुरू ठेवत, पंजाब किंग्जने आयपीएल 2025 मध्ये आपला पाचवा विजय नोंदवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला. पावसामुळे प्रभावित झालेला हा सामना फक्त 14 षटकांचा करण्यात आला, ज्यामध्ये बंगळुरू संघाचे स्टार फलंदाज पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर अपयशी ठरले आणि त्यांना फक्त 95 धावा करता आल्या. प्रत्युत्तर पंजाबने सावध फलंदाजी केली आणि हे लक्ष्य 11 षटकांत पूर्ण केले. युजवेंद्र चहल आणि नेहल वढेरा हे पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले.
अर्शदीप सिंग अन् युजवेंद्र चहलने आरसीबीला गंडवले
आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील रोमांचक सामना पावसामुळे व्यत्यय आला, ज्यामुळे नाणेफेक नियोजित वेळेवर झाले नाही. सामना सुमारे 2 तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. या कारणास्तव, सामना 20 षटकांऐवजी 14 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीची सुरुवात खराब झाली, कारण त्यांचा अर्धा संघ 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि संघाच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या. टिम डेव्हिड वगळता फक्त कर्णधार रजत पाटीदारलाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पाटीदार 18 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावा काढून बाद झाला.
संघाने 63 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. तेथून टिम डेव्हिडने 26 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 50 धावा काढल्या, त्यामुळे संघाचा स्कोअर 95 पर्यंत पोहोचला. टिमने 14 व्या षटकात सलग 3 षटकार मारले. पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले . अर्शदीप सिंगने 3 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले, मार्को जानसेनने 3 षटकांत 10 धावा देत 2 बळी घेतले, चहलने 3 षटकांत 11 धावा देत 2 बळी घेतले आणि हरप्रीत ब्रारने 2 षटकांत 25 धावा देत 2 बळी घेतले तर झेवियर बार्टलेटला एक विकेट मिळाली.
नेहल वढेरा नडला अन् जिंकला...
प्रभसिमरन सिंग (13) आणि प्रियांश आर्य (16) हे देखील पंजाब किंग्जसाठी चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले, कारण ते चार षटकांतच आऊट झाले. पण, पंजाबची सुरुवात बंगळुरूपेक्षा अजूनही वेगवान होती आणि संघाने 7 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. पण आठव्या षटकात, जोश हेझलवूड (3/14) ने श्रेयस अय्यर (7) आणि जोश इंग्लिस (14) यांना आऊट करून बंगळुरूला पुन्हा सामन्यात आणले. तिथून सामना कठीण दिसत होता, पण नेहल वधेरा (33 धावा, 19 चेंडू) ने सुयश शर्माच्या सलग 2 षटकांत 2 षटकार आणि 2 चौकार मारून संघाचा खेळ सोपा केला. अखेर पंजाबने हे लक्ष्य 12.1 षटकांत पूर्ण केले.
