Punjab Kings vs Mumbai Indians Qualifier 2 : इंडियन प्रीमियर लीगला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे. आयपीएल 2025 च्या हंगामाच्या अंतिम फेरीत, असे दोन संघ आमनेसामने येणार आहेत, ज्यांनी आजपर्यंत कधीही विजेतेपद जिंकलेले नाही. मंगळवार 3 जून रोजी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला.

क्वालिफायर 2  सामन्यात हिटमॅन फेल...

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला फारसे काही करता आले नाही आणि तो 7 चेंडूत 8 धावा करून आऊट झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो देखील जास्त काळ टिकू शकला नाही आणि 24 चेंडूत 38 धावा करून आऊट झाला. या खेळीदरम्यान त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

तिलक अन् सूर्या तळपला!

सलामीवीर बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाची धुरा हातात घेतली आणि दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. ही भागीदारी युजवेंद्र चहलने फोडली आणि त्याने सूर्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सूर्यकुमारने 26 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 44 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान, सूर्यकुमारने आयपीएल 2025 मध्ये 700 धावांचा टप्पाही पूर्ण केला. सूर्य बाद झाल्यानंतर तिलकही आऊट झाला आणि त्याच्या बॅटमधून 44 धावा निघाल्या.

शेवटी नमन धीरचा धमाका!

शेवटच्या षटकांमध्ये डाव चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांच्यावर होती. पण, हार्दिकला जास्त योगदान देता आले नाही आणि 13 चेंडूत 15 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. यानंतर, नमनने काही चांगले फटके खेळले, पण तोही शेवटच्या षटकात आऊट झाला. 18 चेंडूत नमनने 37 धावांची खेळी खेळली. राज बावा 8 धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. पंजाब किंग्जकडून अजमतुल्लाह उमरझाईने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

पंजाब किंग्जची खराब सुरुवात, पण जोश इंग्लिसचा तडाखा...

लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाची सुरुवात पण खराब झाली आणि त्यांनी 'इम्पॅक्ट प्लेअर' प्रभसिमरन सिंगची विकेट स्वस्तात गमावली. प्रभसिमरनला 6 धावा काढल्यानंतर ट्रेंट बोल्टने आऊट केले. त्यानंतर, जोश इंग्लिस आणि प्रियांश यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. 20 धावांवर प्रियांशची अश्विनी कुमारने शिकार केली बळी ठरला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब किंग्जला तिसरा धक्का दिला, जेव्हा त्याने जोश इंग्लिसला आऊट केले. इंग्लिसने 21 चेंडूत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या.

पण यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वधेरा यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण 16 व्या षटकात नेहल वधेरा यांची विकेट पडली. यासोबतच 84 धावांची भागीदारीही संपली. नेहलने 48 धावा केल्या. पण श्रेयस अय्यरने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण दरम्यान, 17 व्या षटकात शशांक सिंग धावबाद झाला आणि पंजाबला पाचवा धक्का बसला. पण यानंतर, अय्यरने जबाबदारी स्वीकारली आणि कर्णधारपदाची खेळी खेळत 19 व्या षटकातच पंजाबला विजय मिळवून दिला.