IPL 2024, CSK vs PBKS धर्मशाला : यंदाच्या आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात धर्मशाला येथे मॅच सुरु आहे. पंजाबचा कॅप्टन सॅम करन यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.  चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात पंजाबला यश आलं नाही. पंजाब किंग्जचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबवर चेन्नईनं 28 धावांनी विजय मिळवला. पंजाबचे खेळाडू प्रभासिमरन, जॉनी बेयरस्टो, शशांक सिंह, आशुतोष शर्मा, सॅम करन यांना मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. 


पंजाबची फलंदाजी ढेपाळली


चेन्नई सुपर किंग्जला 167 धावांवर रोखत पंजाबच्या गोलंदाजांनी त्यांची कामगिरी पार पाडली होती. पंजाब किंग्जच्या फलंदाजांवर ती धावसंख्या पार करण्याचं आव्हान होतं. मात्र, पंजाब किंग्जच्या फलंदाजांना त्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. प्रभासिमरन सिंह 30 धावा, शशांक सिंह 27 धावा आणि हरप्रीत ब्रार यानं 17 धावा केल्या.चेन्नई सुपर किंग्जच्या रवींद्र जडेजानं तीन विकेट घेतल्या. तर, सिमरजीत सिंगनं 2 तर तुषार देशपांडेनं 2 विकेट घेतल्या. 


चेन्नईच्या 167 धावा


चेन्नई सुपर किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 167 धावा केल्या. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. अंजिक्य रहाणे आज देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.   कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेलनं डाव सावरला. मात्र,  दोघांना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ऋतुराज गायकवडनं 32 तर मिशेलनं 30  धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजानं जोरदार फलंदाजी करत 43 धावा करुन चेन्नईचा डाव सावरला.  महेंद्रसिंह धोनी आज शुन्यावर बाद झाला. 


चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर


चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये अकरावी मॅच खेळली. एकूण 11 मॅचमध्ये त्यांनी सहा मॅचेसमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.  चेन्नईनं तिसऱ्या स्थानावर झेप घेतल्यानं प्ले ऑफच्या शर्यतीतील चुरस वाढली आहे. गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्स, दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि चौथ्या स्थानावर लखनौ सुपर जाएंटसचा संघ आहे. 


संबंधित बातम्या :


PBKS vs CSK :हर्षल पटेलचा धमाका, भेदक यॉर्करनं धोनीच्या दांड्या गुल, माहीला काही कळलंच नाही, पाहा व्हिडीओ


CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा कमनशिबी ठरला, धोनीचं बारा वर्षापूर्वीचं रेकॉर्ड संकटात, वाचा नेमकं काय घडलं?