Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारची शतकी खेळी आणि त्यानंतर जोश हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केलाय. आरसीबीने 208 धावांचा बचाव करताना लखनौच्या संघाला 193 इतख्या धावांत रोखले. यासह आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर लखनौचं आव्हान संपुष्टात आलेय. क्वालिफायर 2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान यांचा सामना होणार आहे. 


208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. मोहम्मद सिराजने डिकॉकचा अडथळा दूर केला. डिकॉक बाद झाल्यानंतर राहुल आणि मनन वोहरा यांनी लखनौचा डाव सावरणार असे वाटत असतानाच वोहरा 19 धावांवर बाद झाला.. त्यानंतर राहुल आणि दीपक हुड्डा यांनी लखनौसाठी मोठी भागिदारी केली. राहुल आणि दीपक हुड्डा यांनी 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला.. हसरंगाने दीपक हुड्डाचा अडथळा दूर केला..त्यानंतर राहुलने मार्क्स स्टॉयनिसच्या मदतीने विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. पण हर्षल पटेलने स्टॉयनिसला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर राहुलही मोठे फेटके मारण्याच्या प्रयत्नात 79 धावांवर बाद धाला. राहुलने 58 चेंडूत 79 धावांची खेळी केली..राहुलनं क्रृणाल पांड्याही शून्यावर बाद झाला. अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले. 


पाटीदारची शतकी खेळी, कार्तिकचा फिनिशिंग टच -
रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला.  प्रथम फंलदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस गोल्डन डकचा शिकार झाला... मोहसीन खानने फाफला तंबूचा रस्ता दाखवला.. पण त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला.. विराट कोहलीने 24 चेंडूत संयमी 25 धावांची खेळी केली. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 66 धावांची भागिदारी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर लागोपाठ बाद झाले... मॅक्सवेल 9 तर लोमरोर 14 धावा काढून बाद झाला.. तीन विकेट एकापाठोपाठ पडल्यानंतर आरसीबीचा डाव कोसळला असे वाटत होते.. पण तेव्हा रजत पाटीदारने दिनेश कार्तिकच्या मदतीने डाव सावरला... दोघांनी अखेरच्या 30 चेंडूत 80 पेक्षा जास्त धावा केल्या. पाटीदारने नाबाद 112 धावांची खेळी केली. तर कार्तिकने नाबाद 37 धावांची खेळी केली. 


रजत पाटीदारची शतकी खेळी - 
एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले.. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले... एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.. पाटीदारने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला... प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदारने सात षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील पाटीदारचे सर्वात वेगवान शतक ठरलेय..


पाटीदार-कार्तिकची वादळी भागिदारी - 
रजत पाटीदार आणि अनुभवी दिनेश कार्तिकने विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला. त्यांनी अखेरच्या तीस चेंडूत 80 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली... 


लखनौची फ्लॉप गोलंदाजी - 
मोहसीन खानचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. मोहसीन खानने चार षटकात 25 धावा देत एक विकेट घेतली.. चमिराने तर चार षटकात 54 धावा दिल्या.. क्रृणाल पांड्या 39, आवेश खान 44 आणि रवी बिश्नोई 45 धावा खर्च केल्या. क्रृणाल पांड्या, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


लखनौची खराब फिल्डिंग -
लोमरोर याचा उत्कृष्ट झेल घेणाऱ्या केएल राहुलने दिनेश कार्तिकचा झेल सोडला तर मोहसीन खानने रजत पाटीदारला जिवनदान दिले.. रजत पाटीदारला मनन वोहराने दुसरे जिवनदान दिले... झेल सुटल्याचा फायदा घेत दोघांनी फटकेबाजी केली.. डेथ ओव्हरमध्ये दोघांनी धावांचा पाऊस पाडला..


विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचलाय.  विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा  आरोन फिंचला मागे टाकले. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 341 सामन्यात 10590 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने टी20 मध्ये आतापर्यंत पाच शतके आणि 78 अर्धशतके झळकावली आहेत.  


नाणेफेकीचा कौल - 
लखनौचा कर्णधार केएल राहुलने करो या मरोच्या सामन्यात नाणेफेक जिंकली.. राहुलने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते..


दोन्ही संघात बदल -
करो या मरोच्या सामन्यात लखनौ आणि आरसीबी संघात बदल करण्यात आले. लखनौ संघात दोन बदल झाले आहेत. तर आरसीबीने आपल्या संघात एक बदल केलाय. लखनौने कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डरला वगळले. त्यांच्याजागी क्रृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिराला स्थान देण्यात आलेय. आरसीबीने मोहम्मद सिराजला संघात स्थान दिलेय. सिद्धार्थ कौलला आरसीबीने वगळले. 


पावसाचा व्यत्यय
एलिमेनटर सामना सुरु होण्याआधी ईडन गार्डनवर पावसाने हजेरी लावली... धो धो पाऊस पडल्यामुळे सामना उशीराने सुरु झाला.. नाणेफेकीला आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला... पाऊस पडल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते... मैदान संथ झाले होते.