Mumbai Indians Celebration: WPL च्या पहिलं जेतेपदाला मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) गवसणी घातली. रविवारी (26 मार्च) रात्री झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा तीन चेंडू राखून पराभव केला. पहिलंवहिलं जेतेपद पटकावल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. मुंबईचे खेळाडू मैदानावर उशिरापर्यंत जल्लोष करताना दिसले.
अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं सर्वात आधी दिल्लीला केवळ 131 धावांवर रोखलं आणि त्यानंतर केवळ तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं अन् इतिहास रचला. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचं जेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं. फलंदाज सिव्हरनं विजयी चौकार ठोकताच मुंबईचे खेळाडू मैदानाच्या दिशेनं धावले. यावेळी आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बेब्रॉन स्टेडियमवर खेळाडूंसह चाहत्यांनीही मुंबईचा विजय साजरा केला.
WPL चं पहिलं जेतेपद अन् जल्लोष
सामन्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला WPL ट्रॉफी सुपूर्द केली. त्यानंतर हरमनप्रीतनं सहकारी खेळाडूंसह ट्रॉफी उचावली. मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत खूप फोटो काढले. यादरम्यान खेळाडूंनी संघाच्या प्रशिक्षक झुलन गोस्वामीसोबतही खूप मस्ती केली. त्यांच्या मस्तीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही अंतिम सामन्यासाठी उपस्थित
मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही बेब्रॉन स्टेडियमवर उपस्थित होता. मुंबईनं विजय मिळवताच कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यासह संपूर्ण पुरुष संघानं उभं राहून टाळ्या वाजवून आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. महिला संघांचा विजय साजराही केला.
मुंबईच्या पोरींनी मैदान मारलं
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफिक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दिल्लीला धक्के दिली. दिल्लीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. अवघ्या 80 धावांत दिल्लीच्या 7 विकेट गेल्या होत्या. 87 धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज माघारी परतले होते. पण शिखा पांडे आणि राधा यादव यांनी विस्फोटक फलंदाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दहाव्या विकेटसाठी दोघांनी चार धावा जोडल्या. शिखा पांडे 27 नाबाद राहिली तर राधा यादव हिनं 27 नाबाद 27 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार मेग लॅनिंग हिने 35 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकून इस्सी वोंग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर ए केर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :