R Ashwin On Mumbai Indians : आयपीएल 2025 चा अंतिम सामना आता फक्त एक सामना दूर आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. या हंगामात मुंबई इंडियन्सचा प्रवास कठीण होता, त्यांनी सुरुवातीचे सामने जवळजवळ सतत गमावले, परंतु त्यानंतर ते आता सलग 6 सामने जिंकून अंतिम फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहेत. दरम्यान, रविचंद्रन अश्विनने मुंबई इंडियन्स (MI) च्या नशिबावर एक मनोरंजक टिप्पणी केली आहे. एलिमिनेटर सामन्यात एमआयला मिळालेल्या काही 'लकी ब्रेक' बद्दल अश्विनने आपले मत व्यक्त केले आणि 2018 च्या एका सामन्याचे उदाहरणही दिले.
एमआय विरुद्ध जीटी सामन्यानंतर, अश्विनने 2018 मध्ये पंजाब आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्याचा उल्लेख केला. त्यावेळी तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता. पत्रकार विमल कुमारशी बोलतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यामध्ये अश्विनने सांगितले की, "त्या सामन्यात 13 षटकांनंतर मुंबई बॅकफूटवर होती आणि त्यानंतर फ्लडलाइट्स अचानक बंद पडल्या, ज्यामुळे 20 मिनिटांचा ब्रेक झाला. त्यानंतर मुंबईने जोरदार पुनरागमन केले. किरॉन पोलार्डने जबरदस्त खेळी केली. मला वाटतं मुंबईने सुमारे 200 धावा केल्या होत्या." अश्विन येथे असे म्हणत होता की, अचानक झालेल्या ब्रेकमुळे पंजाबच्या गोलंदाजांची लय बिघडली, ज्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना नंतर वेळ मिळाला. अश्विनने थेट कोणालाही दोष दिला नाही.
पुढे तो म्हणाला की, "मी विचार केला, हे कसे होऊ शकते? मुंबई इंडियन्सना असा ब्रेक कसा मिळतो? मुंबई इंडियन्सला असे 'नशीब' वारंवार कसे मिळते , मला माहित नाही... काहीतरी गडबड आहे. आपल्यालाही ते 'नशीब' शोधावे लागेल. ते कसे येते? मला माहित नाही." अश्विनचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
आज क्वालिफायर-2 चा सामना
आयपीएल 2025 च्या हंगामात आज क्वालिफायर-2 चा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. या सामन्यात विजयी होणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत 3 जून रोजी अंतिम सामना खेळेल. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल.