MI vs RR, IPL 2024 : युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सची भक्कम फलंदाजी ढेपाळली. मुंबईला निर्धारित 20 षटकांमध्ये फक्त 125 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली, त्याशिवाय तिलक वर्माने 32 धावा केल्या. राजस्थानकडून चहल आणि बोल्ट यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्थानला सामना जिंकण्यासाठी 126 धावांचं सोप्पं आव्हान मिळालं आहे. मुंबईचे गोलंदाज 126 धावसंख्येचा कसा बचाव करतात, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय.
बोल्टपुढे आघाडीची फळी ढेपाळली -
बोल्टच्या 'रॉयल' वादळात मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खातेही उघडता आले नाही. बोल्टने पहिल्या दोन षटकांत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. बोल्टच्या माऱ्यापुढे एकाही फलंदाजाला टिकता आले नाही. बोल्टने अचूक टप्प्यावर मारा करत मुंबईच्या फलंदाजांना बाद केले. रोहित शर्मा याला खातेही उघडता आले नाही, तो गोल्डन डकचा शिकार ठरला. नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस हेही शून्यावरच बाद झाले. एका बाजूला विकट पडत असताना दुसऱ्या बाजूला ईशान किशन यानं फटकेबाजी सुरुच ठेवली होती. पण नांद्रे बर्गर यानं ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशान किशन यानं 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली. 4 षटकांमध्ये मुंबईने चार फलंदाजांना गमावत 20 धावा केल्या होत्या.
हार्दिक पांड्याचा प्रतिकार, पण चहलचा भेदक मारा -
अवघ्या 20 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. दोघांनी फटकेबाजी करत वेगानं धावा वाढवल्या. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी 36 चेंडूमध्ये 56 धावांची भागिदारी केली. मुंबईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. मुंबईच्या इतर फलंदाजांना भागिदाऱ्या करता आल्या नाहीत. हार्दिक पांड्याने 21 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. तर तिलक वर्मा याने 29 चेंडूमध्ये 32 धावांचे योगदान दिले, यामध्ये दोन षटकारांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांची जोडी जमली होती, पण युजवेंद्र चहल याने मुंबईचा मध्यक्रम तंबूत पाठवला. चहलने हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि गेराल्ड कोएत्जे यांना बाद केले.
मुंबईला फिनिशिंग टच मिळाला नाही -
आघाडीची फळी लवकर तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी डावाला आकार दिला होता. मुंबईचा संघ 150 धावसंख्येपर्यंत पोहचेल असं वाटत होतं, पण तळाच्या फलंदाजांना मोठी खेळी करत आली नाही. टीम डेविड आणि गेराल्ड कोइत्जे यांनी विकेट फेकल्या. टीम डेविड यानं 24 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. गेराल्ड कोइत्जे यानं 9 चेंडूमध्ये चार धावा केल्या. पियूष चावला याला 6 चेंडमध्ये 3 धावा करता आल्या. अखेरीस जसप्रीत बुमराह यानं नाबाद 8 धावा केल्या. तर आकाश मढवाल चार धावांवर नाबाद राहिला.
बोल्ट-चहलचा भेदक मारा -
ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी आजच्या सामन्यात भेदक मारा केला. चहलने चार षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. तर बोल्टने 22 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना बाद केले. नांद्रे बर्गर याला दोन विकेट मिळाल्या. तर आवेश खान याने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.