MS Dhoni's Inputs Were Taken For Ajinkya Rahane Selection : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची नुकतीच निवड केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघामध्ये अजिंक्य रहाणे याला संधी देण्यात आली. १५ महिन्यानंतर अजिंक्य रहाणे याचे टीम इंडियात कमबॅक झालेय. रहाणे याला वार्षिक करारातूनही वगळण्यात आले होते..रहाणे याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.  त्याच श्रेयस अय्यरच्या दुखापीतही अजिंक्य रहाणेच्या पथ्थ्यावर पडले.. पण अजिंक्य रहाणे याला टीम इंडियात स्थान मिळवण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा संघ निवडण्यापूर्वी धोनीने निवड समितीला काही अनपूट दिले होते.


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अजिंक्य रहाणे वेगळ्याच अवतारात दिसत आहे. अजिंक्य रहाणे पावरप्लेमध्ये २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. रहाणे याने आतापर्यंत दमदार कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी अजिंक्य रहाणे याची निवड करण्यापूर्वी निवड समितीने धोनीचा सल्ला घेतला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही फायनल 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधल्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल.


अजिंक्य रहाणे याने आपला अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळला होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे रहाणे याला संघातून डच्चू देण्यात आला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी केल्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नई संघासोबत खेळण्याची संधी मिळाली. येथे रहाणे याची कामगिरी अधिकच चांगली झाली. आयपीएलमध्ये रहाणे याने  5 डावात 52.25 च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राईक रेटने 209 धावा चोपल्या आहेत. 






इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव -


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत होत आहे. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर या दोन्ही संघात मुकाबला होत आहे. अजिंक्य रहाणे याला ओव्हलवर खेळण्याचा अनुभवही आहे.  अजिंक्य रहाणे  याने इंग्लंडमध्ये खूप क्रिकेट खेळले आहे. त्याचा अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. रहाणे याने इंग्लडमध्ये  एक शतक आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने 729 धावा चोपल्या आहेत.   


देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस -


अजिंक्य रहाणे याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहेच. पण त्याला फक्त आयपीएलच्या कामगिरीच्या आधारवर संघात स्थान दिले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत.  2022-23 च्या हंगामात अजिंक्य रहाणे याने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. रणजी सामन्यात अजिंक्य रहाणे याने ११ डावात ५८ च्या सरासरीने ६३४ धावा केल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम इंडियाला एका अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यातच अजिंक्य रहाणे भन्नाट फॉर्मात परतला.. रणजी आणि आयपीएलमधील कामगिरी पाहाता बीसीसीआयने अजिंक्यला टीम इंडियात स्थान दिलेय. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी पुन्हा फलंदाजीला उतरेल.