MS Dhoni Out Or Not Out CSK vs KKR IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कर्णधार म्हणून एमएस धोनीने पुनरागमन केले. 11 एप्रिल शुक्रवारी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यासह धोनी सुमारे 683 दिवसांनी कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये परतला. या हंगामात सलग 5 पैकी 4 सामने गमावलेल्या चेन्नईला आशा होती की, धोनीचे कर्णधार म्हणून पुनरागमन संघात नवीन ऊर्जा आणेल आणि खेळाडूंचा उत्साह वाढवेल, परंतु तसे झाले नाही आणि पुन्हा एकदा फलंदाजांनी नांग्या  टाकल्या. यावेळी धोनीही फलंदाजीने संघाला काहीही योगदान देऊ शकला नाही. तो स्वस्तात बाद झाला. पण, तो ज्या पद्धतीने बाहेर पडला त्यामुळे वाद निर्माण झाला.

MS धोनी OUT की NOT OUT?

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 15 व्या षटकात फक्त 72 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत, धोनी पुन्हा एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चाहत्यांना अपेक्षा होती की धोनी काही मोठे फटके मारून संघाची सूत्रे हाती घेईल. पण तोही पुढच्याच षटकात आऊट झाला. पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज सुनील नारायणने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. 16 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीच्या विरोधात एलबीडब्ल्यू अपील करण्यात आले, ज्यावर पंचांनी त्याला आऊट घोषित केले.

थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला... 

धोनीने लगेच डीआरएस घेतला आणि येथूनच संपूर्ण वाद पेटला झाला. जेव्हा तिसऱ्या पंचांनी निर्णय घेण्यासाठी स्निकोमीटरची मदत घेतली. तेव्हा असे दिसून आले की जेव्हा चेंडू धोनीच्या बॅटजवळ होता तेव्हा स्निकोमीटरवर काही हालचाल दिसून आली. यामुळे धोनीला काहीसा दिलासा मिळाला आणि तो आऊट होणार नाही असे वाटले. पण पंचांनी चेंडू बॅटला लागला नाही असे सांगताच सर्वांना आश्चर्य वाटले. यानंतर, बॉल ट्रॅकिंगमध्ये हे स्पष्ट झाले की चेंडू स्टंपला लागला होता आणि म्हणूनच त्याला आऊट देण्यात आले. 4 चेंडू खेळल्यानंतर धोनी फक्त 1 धाव करू शकला.

मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग थेट मैदानात अंपायरशी भिडला...

धोनीने पंचांशी वाद घातला नाही पण त्यानंतर लगेचच संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग फील्ड पंच क्रिस गॅफनी यांच्याशी बोलताना आणि या निर्णयावर प्रश्न उपस्थित करताना दिसले. सर्वांना आश्चर्य वाटले की जर चेंडू आणि बॅटमध्ये संबंध नव्हता, तर स्निकोमीटरवर अशी काय हालचाल होती, ज्याचे स्पष्टीकरण तिसऱ्या पंचांनी दिले नाही.