MS Dhoni IPL Retirement : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा महाविजेचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ ठरला आहे. यंदाचा हंगाम कर्णधार धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई संघासाठी फारच खास होता. कारण, गेल्या हंगामात चेन्नई नवव्या क्रमांकावर होता. यंदाच्या हंगामात मात्र चेन्नईनं दमदार वापसी करत विजेतेपद पटकावलं. यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाला कर्णधार धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर धोनीनं निवृत्तीच्या चर्चांवर पुन्हा एकदा स्पष्ट उत्तर दिलं आहे.
धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?
धोनीनं अंतिम सामन्यानंतर मुलाखतीत प्रतिक्रिया देताना पुढील आयपीएलबाबत उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. धोनीनं सांगितलं की, चाहत्यांनी भरभरून दिलेलं प्रेम पाहता आता निवृत्तीबाबत काही बोलणं चुकीचं ठरेल. मला त्यांच्या प्रेमाची परफेड करायची आहे. धोनीला पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर येलो आर्मी मोठ्या संख्येनं दिसून आली. गुजरातच्या होमग्राऊंडवर जणू पिवळ वादळ आलं होतं.
निवृत्तीच्या चर्चांबाबत धोनीनं स्पष्टंच सांगितलं
धोनी पुढे म्हणाला की, ''चाहते माझ्यासोबत जोडले गेले आहे, हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे. आजही चाहत्यांचं प्रेम पाहून माझे डोळे पाणावले. मलाही त्यांना एक भेट द्यायची आहे. आणखी एक आयपीएल हंगाम खेळणं माझ्यासाठी सोपं जाणार नाही, पण मी खूप मेहनत करुन पुढच्या हंगामात परतण्याचा प्रयत्न करेन.''
धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
आयपीएल 2023 महेंद्र सिंह धोनीसाठी शेवटचा हंगाम असेल यानंतर धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही, असं बोललं जात होतं. पण, धोनीनं पुन्हा एकदा निवृत्तीबाबतच्या चर्चा खोडून काढल्या आहेत. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीच्या चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता. याबाबत निवृत्तीबाबत धोनीनं कोणतीही घोषणा केलेली नव्हती पण, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतर धोनीनं प्रतिक्रिया देत चाहत्यांना आशेचा किरण दाखवला आहे. ही धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.