MS Dhoni Statement On Retirement : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून हंगामाचा निरोप घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 230 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला फक्त 147 धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला. संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा धोनीकडे होत्या की, तो निवृत्त होणार की नाही. या सामन्यानंतर धोनीने सांगितले की, निवृत्तीच्या निर्णयाची घाईगडबड नाही, अजून तीन चार महिने पाहुयात.

सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, "मी असे म्हणणार नाही की आजचा दिवस हाऊसफुल होता. आमचा हंगाम चांगला गेला नाही, पण आज उत्तम कामगिरींपैकी एक होता. आम्ही स्पर्धेत जास्त  कॅच घेतले नाहीत, पण आज चांगली कामगिरी केली. निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, त्यामुळे कोणती घाईगडबड नाही. शरीराला तंदुरुस्त ठेवण्याची गरज आहे. कारण तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कामगिरीची आवश्यकता आहे. जर क्रिकेटपटू त्यांच्या कामगिरीमुळे निवृत्त होऊ लागले तर त्यापैकी काही 22 वर्षांच्या वयात निवृत्त होतील."

धोनी पुढे म्हणाला, "आता मी रांचीला परत जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की माझे काम संपले... आणि मी परत येत आहे असे म्हणत नाही. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी त्याबद्दल विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन. जेव्हा आम्ही हंगाम सुरू केला, तेव्हा चार सामने चेन्नईमध्ये होते. आम्ही दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु मला वाटले की पहिल्या डावात फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली आहे. काही रिक्त जागा भरून काढाव्या लागतील. पुढच्या हंगामात ऋतुराजला खूप गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही." 

गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनी झाला होता कर्णधार...

धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीबद्दल अनेक चर्चा झाल्या आहेत, परंतु माही म्हणाला की या संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे अजूनही बराच वेळ आहे. धोनी सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचे नेतृत्व करत होता. धोनीच्या नेतृत्वाखाली या हंगामात सीएसकेची कामगिरी चांगली नव्हती आणि संघाला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले.