IPL 2026 Mumbai Indians Controversy : आयपीएल 2026 चा थरारक हंगाम नुकताच संपला असून 31 मे रोजी या हंगामाचा महाअंतिम सामना खेळवला गेला. मात्र, हा हंगाम संपून अवघे तीन दिवस उलटत नाही तोच क्रिकेट जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत फ्रेंचायझींपैकी एक असलेल्या 'मुंबई इंडियन्स'वर (Mumbai Indians) एका स्टार परदेशी खेळाडूने मानधनाचे पूर्ण पैसे न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून न्यूझीलंडचा ऑलराउंडर मिचेल सँटनर (Mitchell Santner) आहे.

Continues below advertisement

मिचेल सँटनर हा आयपीएल 2026 च्या हंगामात दुखापतीमुळे (Injury) मुंबई इंडियन्ससाठी पूर्ण सामने खेळू शकला नव्हता. सँटनरने आता एका पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की, मुंबई इंडियन्सने त्याला करारातील मानधनाची केवळ अर्धीच रक्कम दिली आहे. मुंबई इंडियन्सने सँटनरला 2 कोटी रुपयांच्या किमतीत रिटेन (Retain) केलं होतं. दुखापतीचे निमित्त करून सँटनर न्यूझीलंडच्या कसोटी संघात सामील झाल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. आता या सर्व वादावर खुद्द कीवी ऑलराउंडरने मौन सोडलं असून मुंबई इंडियन्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Mitchell Santner Injury : खांद्याला दोनदा गंभीर दुखापत

'द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट'वर (The Grade Cricketer Podcast) बोलताना मिचेल सँटनरने आयपीएल दरम्यान घडलेली संपूर्ण कहाणी सविस्तर सांगितली. तो म्हणाला की, "माझ्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यामुळे मी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना खेळू शकलो नव्हतो. त्यानंतर मी दिल्लीविरुद्धचा सामना खेळलो, पण दुर्दैवाने त्याच सामन्यात माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरून जेव्हा मी पुन्हा संघात पुनरागमन केले, तेव्हा माझ्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुहेरी दुखापतींमुळे मला या संपूर्ण हंगामात केवळ 4 सामनेच खेळता आले."

Continues below advertisement

Mitchell Santner Salary Claim : खेळताना जखमी, पण अर्धीच सॅलरी मिळाली!

सँटनरने संताप व्यक्त करत सांगितलं की, "माझ्या दोन्ही खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. मला असं वाटलं की मी संघासाठी माझे शरीर पणाला लावत आहे, पण फ्रेंचायझीने माझी ही मेहनत आणि त्याग लक्षातच घेतला नाही." 

पुढे मानधनाचा मोठा खुलासा करताना तो म्हणाला की, मुंबई इंडियन्सने माझ्या 2 कोटी रुपयांच्या एकूण सॅलरीमधील केवळ अर्धाच हिस्सा मला दिला आहे. फ्रेंचायझीची ही वागणूक मला अजिबात आवडलेली नाही.

IPL Rules Injured Player : काय सांगतो आयपीएलचा नियम?

मिचेल सँटनरच्या या आरोपानंतर आयपीएलमधील खेळाडूंच्या मानधनाचे नियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आयपीएलच्या अधिकृत नियमांनुसार, जर एखादा खेळाडू स्पर्धेच्या दरम्यान किंवा कॅम्पमध्ये असताना दुखापतग्रस्त (Injured) झाला, तर फ्रेंचायझीला त्याच्या कराराची पूर्ण रक्कम देणं बंधनकारक असतं. 

बऱ्याचदा खेळाडूंचे मानधन काही हप्त्यांमध्ये (Installments) दिले जाते. त्यामुळे सँटनरला उर्वरित पैसे नंतर मिळणार आहेत की मुंबईने त्याचे पैसे खरोखरच कापले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण वादावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा बाजू समोर आलेली नाही.

ही बातमी वाचा: