Gujarat Titans vs Lucknow Super Giants : गुजरात टायटन्स आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असले तरी त्यांना लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला. लखनौने प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या आणि शुभमन गिलचा गुजरात संघ या लक्ष्यासमोर फिका पडला. लखनौने हा सामना 33 धावांनी जिंकला. गुजरात संघ 20 षटकांत 202 धावा करू शकला. प्लेऑफआधी असा पराभव गुजरात टायटन्सच्या आगामी सामन्यांसाठी धोक्याची घंटा असू शकते.

नाणेफेक गमावल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी आली. मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी पॉवरप्लेमध्येच काही चांगले फटके मारले आणि गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना एकही विकेट घेऊ दिली नाही. या हंगामातील लखनौची कामगिरी पाहता असे वाटत होते की, मैदान मोकळे झाल्यानंतरही गुजरात पुनरागमन करेल. पण दोघांनीही धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. यादरम्यान मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी 10 व्या षटकात 91 धावांवर फुटली. मार्करामला साई किशोरने आऊट केले. मार्करामने 24 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या.

मार्श आणि पूरनसमोर गुजरातच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले 

सलामीची भागीदारी तोडल्यानंतर गुजरातला पुनरागमनाची आशा होती, पण मिचेल मार्शला साथ देण्यासाठी आलेल्या निकोलस पूरननेही आपली स्फोटक खेळी सुरू केली. लखनौने 15 व्या षटकातच 150 धावांचा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, मार्शने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे आयपीएल 2025 मधील कोणत्याही परदेशी फलंदाजाचे पहिले शतक आहे. मार्श आणि पूरन यांच्यातील शतकी भागीदारीमुळे, एलएसजीने 18 व्या षटकात 200 धावा पूर्ण केल्या. मार्शचा डाव अर्शद खानने संपवला आणि मार्श 64 चेंडूत 117 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्शच्या खेळीत दहा चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. तर पूरनने 27 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह 56 धावा काढत नाबाद राहिला.

ऋषभ पंतनेही मारले दोन षटकार

मार्श आऊट झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीला आला, जो या हंगामात फारसे काही करू शकला नव्हता. पण, आज त्याने चांगली फलंदाजी केली आणि दोन षटकारांच्या मदतीने 6 चेंडूत 1 धावा काढून नाबाद राहिला. अशाप्रकारे, लखनौ संघाने आयपीएलच्या इतिहासात पहिल्या डावात तिसरी सर्वोच्च धावसंख्या करण्यात यश मिळवले.

शेरफेन रदरफोर्ड आणि शाहरुख खान नडले पण...

236 धावाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली. 'इम्पॅक्ट प्लेअर' साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून 27 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. विल्यम ओ'रोर्कने सुदर्शनला (21 धावा, 16 चेंडू, 4 चौकार) आऊट करून ही भागीदारी मोडली. सुदर्शननंतर शुभमनने जोस बटलरसोबत 39 धावांची भागीदारी केली. शुभमनने 20 चेंडूंत सात चौकारांसह 37 धावा केल्या आणि त्याची शिकार अवेश खानने केली. शुभमननंतर जोस बटलर देखील इम्पॅक्ट प्लेअर आकाश सिंगच्या एका इनस्विंगरवर आऊट झाला. बटलरने 18 चेंडूत 33 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

येथून, शेरफेन रदरफोर्ड आणि शाहरुख खान यांच्यात 86 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरातने सामन्यात विजयाकडे वाटचाल सुरू केली. 38 धावा करून रदरफोर्ड बाद झाला तेव्हा गुजरातसाठी विजय सोपा दिसत होता. यावेळी गुजरातला 23 चेंडूत 54 धावांची आवश्यकता होती. एकेकाळी गुजरातने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या, पण पुढील 6 विकेट्स 20 धावांच्या आतच पडल्या. त्यामुळे गुजरात संघाला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 202 धावा करता आल्या. लखनौकडून विल्यम ओ'रोर्कने 3 तर अवेश खान आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दरम्यान, आकाश सिंग आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.