IPL 2025 Lucknow Super Giants vs Punjab Kings: आयपीएल 2025 मध्ये काल (1 एप्रिल ) लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (Lucknow Super Giants vs Punjab Kings) यांच्यातील सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्सने या सामन्या 8 विकेट्सने विजय मिळवला. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. ऋषभ पंत, मिचेल मार्श आणि डेव्हिड मिलर सारखे प्रसिद्ध फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. दरम्यान, निकोलस पूरनने 30 चेंडूत 44 धावांची खेळी केली आणि एकेकाळी निकोलस पूरन लखनौ संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात होता, पण पंजाब किंग्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याला बाद केले.

मार्कस स्टोइनिसने टाकलेल्या 11 व्या षटकात निकोलस पूरनने एक चौकार आणि एक मोठा षटकार मारला. निकोलस पूरन आक्रमक खेळी खेळत होता. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाद करणे पंजाबसाठी महत्वाचे होते. श्रेयस अय्यरने पुढच्याच षटकात युझवेंद्र चहलच्या हातात चेंडू दिला. या 12 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, पूरनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत गेला. ग्लेन मॅक्सवेलने पूरनचा झेल घेऊन त्याला बाद केले. मॅक्सवेलने कॅच घेतल्यानंतर जेव्हा कॅमेरा चहलकडे वळला तेव्हा तो निकोलस पूरनला शिवीगाळ करताना दिसला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाबकडून युझवेंद्र चहलची पहिली विकेट

आयपीएल 2025 मध्ये, युजवेंद्र चहलने पंजाब किंग्सकडून पदार्पण केले आहे. पहिल्या सामन्यात म्हणजे गुजरात टायटन्सविरुद्ध चहलला एकही विकेट घेता आली नाही, पण लखनौविरुद्ध त्याने निकोलस पूरनला बाद केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पंजाबकडून खेळताना चहलचा हा पहिलाच बळी आहे.

युझवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज-

युझवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे आणि आयपीएलच्या इतिहासात 200 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. युझवेंद्र चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 206 विकेट्स घेतल्या आहेत. चहलने बंगळुरुकडून खेळताना 139 आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 66 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातमी:

LSG vs PBKS IPL 2025: आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO