Chennai Super Kings vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील सामन्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये 4 मे रोजी होणार्‍या सामन्यात बदल करण्यात आला आहे. आयपीएल 2023 मध्ये 4 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील हा सामना होणार होता. आता हा सामना एका दिवस आधी घेण्यात येणार आहे. या संघांमधील हा सामना आता 4 मे ऐवजी 3 मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौमधील मैदानावर खेळवण्यात येणार आहे. लखनौमध्ये 4 मे रोजी महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे लखनौ (LSG) आणि चेन्नई (CSK) यांच्यातील सामन्यात बदल करण्यात आला आहे.


डबल हेडर सामने


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात 4 मे रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार होते. एक सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात तर दुसरा सामना डबल हेडर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार 4 मे रोजी, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होऊन. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार होता. मात्र, वेळापत्रकात बदल केल्यानंतर आता लखनौ आणि चेन्नई यांच्यात होणारा सामना 3 मे रोजी दुपारी 3.30 वाजता होईल. त्याच दिवशी संध्याकाळी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी एकच सामना संध्याकाळी 7.30 वाजता होईल. यावेळी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत पाहायला मिळेल. 


लखनौ एका दिवसाच्या अंतराने खेळणार दोन सामने


सामन्यातील बदलामुळे लखनौ संघाला आता एका दिवसाच्या अंतराने दोन सामने खेळावे लागणार आहेत. लखनौ-चेन्नई सामन्यातील बदलामुळे आता 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्यानंतर 3 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स संघ पुन्हा त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध लढताना दिसणार आहे. त्यामुळे केएल राहुलच्या संघाला दोन सामन्यांमध्ये फक्त एका दिवसाचा वेळ मिळेल. मात्र, चेन्नई संघाला लखनौपेक्षा जास्त वेळ मिळेल. चेन्नईचा संघ 30 एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यानंतर 3 मे रोजी चेन्नई लखनौ विरोधात मैदानावर उतरेल त्यामुळे चेन्नई संघाला दोन सामन्यांच्या मधे दोन दिवसांचा ब्रेक मिळेल.


निवडणुकांमुळे वेळापत्रकात बदल


इंडियन प्रीमियर लीग दरम्यान यापूर्वी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर निवडणुका झाल्या आहेत. 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. त्याच वेळी, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटपर्यंत आयपीएल यूएईमध्ये खेळली गेली. 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळले गेले.