Delhi Capitals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल 2025 मधील त्यांच्या पाचव्या सामन्यात बंगळुरूचा दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना अपयशी ठरला आणि त्यांना फक्त 163 धावा करता आल्या. यानंतर, केएल राहुलने सलग दुसरे अर्धशतक झळकावले आणि दिल्ली संघाला विजयाकडे नेले.
फिल सॉल्टकडून तुफानी सुरुवात...
गुरुवार, 10 एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर बंगळुरूला प्रथम फलंदाजी करावी लागली. याआधीही संघाला प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यावेळीही काहणी बदलली नाही. पण, यावेळी संघाची सुरुवात चांगली झाली आणि फिल सॉल्टने मैदानात येताच स्फोटक फलंदाजी केली आणि दिल्लीला बॅकफूटवर फेकले.
चौथ्या षटकात फिरला सामना
पण चौथ्या षटकात सगळं बदललं, जेव्हा विराट कोहली आणि सॉल्टमध्ये गैरसमज झाला आणि सॉल्ट रनआऊट झाला. येथून, बंगळुरूचा खेळ मंदावला आणि विकेट्सची झुंबड उडाली. विपराज निगम, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी मधल्या षटकांमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांना रोखले. कर्णधार रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांनाही यावेळी काही विशेष कामगिरी करता आली नाही. शेवटी, टिम डेव्हिडने फक्त 20 चेंडूत जलद 37 धावा करत संघाला 163 धावांपर्यंत पोहोचवले आणि सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले.
खराब सुरुवातीनंतर राहुल-ट्रिस्टन स्टब्सचा धुमाकूळ
दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि पाचव्या षटकापर्यंत संघाने 3 विकेट गमावल्या होत्या, तर धावसंख्या फक्त 30 धावा होती. भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांनी दिल्लीला हे धक्के दिले. 58 धावांवर कर्णधार अक्षर पटेलही पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा वेळी, केएल राहुल मैदानावर आला आणि त्याने डावाची सूत्रे हाती घेतली आणि त्याला ट्रिस्टन स्टब्सने साथ दिली. दोघांनी मिळून हळूहळू संघाचा स्कोअर पुढे नेला. 14व्या षटकापर्यंत दिल्लीचा धावसंख्या फक्त 99 धावा होती आणि शेवटच्या 6 षटकात त्यांना 65 धावांची आवश्यकता होती.
पाऊस आला अन् केएल राहुलने बदलले गीअर्स...
येथे पावसाची शक्यता होती आणि डकवर्थ-लुईस स्कोअरनुसार दिल्लीचा संघ मागे होता. येथूनच केएल राहुलने गीअर्स बदलले आणि सामना बंगळुरूच्या आवाक्याबाहेर नेला. राहुलने 15 व्या षटकात जोश हेझलवूडला बाद केले आणि 22 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, राहुल आणि स्टब्सने प्रत्येक षटकात बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाला चौकार ठोकला आणि 18 व्या षटकात, राहुलने एक शानदार षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. राहुलने फक्त 53 चेंडूत 93 धावा काढत नाबाद राहिला, तर स्टब्सनेही 38 धावांचे योगदान दिले.