KKR Vs RCB: आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
केकेआरसाठी फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा, सुनील नारायणने 22 चेंडूत 47 धावा, व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. दरम्यान या सामन्यातील व्यंकटेश अय्यरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपले अर्धशतक झाल्यानंतर व्यंकटेश कोणाला तरी फ्लाइंग किस देताना दिसून येत आहे.
व्यंकटेश आरसीबीविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 30 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. व्यंकटेशच्या या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर व्यंकटेशने आपली जोडीदार श्रुतीला फ्लाइंग किस दिली. हा सामना पाहण्यासाठी श्रुतीही मैदानात उपस्थित होती. श्रुती आणि व्यंकटेश यांची एंगेजमेंट झाली आहे. या दोघांनी नोव्हेंबर 2023 मध्ये एंगेजमेंट केली होती. व्यंकटेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली होती.
व्यंकटेश अय्यरची कारकीर्द-
व्यंकटेशच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर तो प्रभावी ठरला आहे. त्याने 38 सामन्यात 1013 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत. व्यंकटेशने या मोसमात 2 सामन्यात 57 धावा केल्या आहेत. व्यंकटेशने गेल्या मोसमात 14 सामन्यांत 404 धावा केल्या होत्या. त्यानत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती.
केकेआरने सलग दोन सामने जिंकले-
कोलकाता नाईट रायडर्सने सलग दुसरा सामना जिंकला आहे. पहिला सामना त्यांनी 4 धावांनी जिंकला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव झाला. केकेआरचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. हा सामना 3 एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
गुणतालिकेत केकेआर दुसऱ्या स्थानावर-
आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 3 सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने सलग दुसरा सामना जिंकून 2 गुण जमा केले आणि आता 2 सामन्यात 2 विजयांसह त्यांचे एकूण 4 गुण झाले आहेत. यासह, संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले आहे आणि त्यांचा नेट रनरेट +1.047 झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज अजूनही अव्वल स्थानावर आहे, त्यांचे आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून त्यांचे 4 गुण आहेत. परंतु +1.979 च्या चांगल्या नेट रनरेटमुळे, चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.