Kagiso Rabada Suspension : IPL सोडून घरी पळून गेलेला कागिसो रबाडा ड्रग्स प्रकरणात अडकला, घालण्यात आली बंदी; जाणून घ्या प्रकरण
Kagiso Rabada drugs News : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पहिल्या दोन सामन्यांनंतर अचानक आयपीएल सोडून आपल्या देशात गेला होता.

Kagiso Rabada Suspension : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पहिल्या दोन सामन्यांनंतर अचानक आयपीएल सोडून आपल्या देशात गेला होता. यंदाच्या हंगामात तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. सुरुवातीला असे वृत्त होते की, रबाडा वैयक्तिक कारणांमुळे त्याच्या देशात परतला आहे. पण वैयक्तिक कारण काय होते हे कोणालाही माहिती नव्हते. आता रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून तो आयपीएल सोडून दक्षिण आफ्रिकेत का पळून गेलेला याचे कारण सांगितले आहे. गुजरातने रबाडाला खरेदी करण्यासाठी 10.75 कोटी रुपये खर्च केले होते.
ड्रग्स प्रकरणात अडकला रबाडा, घालण्यात आली बंदी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावर ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे, अशी बातमी शनिवारी आली. रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. रबाडाने कबूल केले की, त्याने असे काहीतरी वापरले जे नियमांविरुद्ध होते. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून तात्पुरते दूर राहावे लागेल. त्यांनी याबद्दल माफीही मागितली आहे.
कागिसो रबाडा याने निवेदनात म्हटले आहे की, 'मी अलीकडेच वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2025 च्या मधून दक्षिण आफ्रिकेला आलो होतो. हे घडले कारण मी एक ड्रग घेतला होता, आणि त्या ड्रगची टेस्ट सकारात्मक आली. मी ज्या लोकांना नाराज केले आहे त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. यापुढे क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांना हलक्यात घेणार नाही. हे माझ्या वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे आहे.
Kagiso Rabada confirms in a statement through South Africa’s players union that he is currently serving a provisional suspension after testing positive for a recreational drug pic.twitter.com/gUd9Uu1Vhu
— Ali Martin (@Cricket_Ali) May 3, 2025
रबाडाने सर्वांचे मानले आभार
रबाडाने त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला साथ दिली त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, 'मी माझ्या एजंट, क्रिकेट साउथ आफ्रिका आणि गुजरात टायटन्स याने पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो.' मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन आणि माझ्या कायदेशीर टीमचे त्यांच्या मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे त्यांच्या समजूतदारपणा आणि प्रेमाबद्दल आभार मानू इच्छितो.
कागिसो रबाडाने पोस्टमध्ये त्याच्यावर किती काळ बंदी घालण्यात आली आहे याची माहिती दिली नाही. रबाडावर किती काळ बंदी आहे आणि तो क्रिकेटमध्ये कधी परतू शकतो हे पाहणे मनोरंजक असेल. सध्या तरी, रबाडाने त्याच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. त्याने म्हटले आहे की तो या कठीण काळातून बाहेर पडेल आणि लवकर परत येईल.




















