IPL Rohit sharma, MI vs DC : आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. दिल्लीविरोधात वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने वादळी फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मुंबईने दिल्लीचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईच्या विजयात रोहित शर्माने सिंहाचा वाटा उचलला. पण रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. दिल्लीविरोधात रोहित शर्मा 49 धावांवर बाद झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 49 धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे. रोहित शर्माचं नशीबच खराब असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाय रोहित शर्मा कमनशिबी आहे, असेही काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 


दिल्लीविरोधात रोहित शर्मा भन्नाट फलंदाजी करत होता. रोहित शर्माच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. रोहित शर्मा आज मोठी धावसंख्या उभारणार असेच सर्वांना वाटत होते. पण रोहित शर्मा 49 धावांवर बाद झाला. रोहित शर्माने 27 चेंडूमध्ये 3 षटकार आणि सहा चौकाराच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. फक्त एका धावामुळे रोहित शर्माचे अर्धशतक हुकलं. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 49 धावांवर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात रोहित शर्मा 3 वेळा 49 धावांवर बाद झाला आहे. इतकेच नाही तर 40 ते 50 धावसंख्येदरम्यान सर्वाधिकवेळा बाद होण्याचा रेकॉर्डही रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. यादरम्यान रोहित शर्मा 20 वेळा बाद  झाला आहे. 


रोहित शर्मा आयपीएल 2010 मध्ये पहिल्यांदा 49 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरोधातच 49 धावांवरच त्यानं विकेट फेकली होती.  फक्त एका धावेमुळं अर्धशतक हुकण्याची आयपीएलमध्ये रोहित शर्माची तिसरी वेळ ठरली. रोहित शर्मानंतर या यादीत डेविड वॉर्नर, ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्कुलम, संजू सॅमसन आणि ख्रिस लिन यांचा क्रमांक लागतो. हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये प्रत्येकी दोन वेळा 49 धावांवर बाद झाले आहेत. 


आयपीएल 2024 मध्ये शानदार फॉर्मात हिटमॅन 


आयपीएल 2024 आधी रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून घेतलं. पण रोहित शर्माने आपल्या बॅटने उत्तर दिले. रोहितला चार सामन्यात एकही अर्धशतक ठोकता आले नाही, पण त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. रोहित शर्माने चार सामन्यात 171 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. रोहित शर्माने चार सामन्यात 118 धावा केल्या आहेत. 49 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहित शर्माचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट 130 इतका आहे, पण यंदाच्या हंगामात त्यानं आक्रमक रुप धारण करत 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली.