IPL 2022 : पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने शनिवारी दिल्लीचा पराभव केला. या विजयासह मुंबईने आयपीएलच्या या हंगामाचा निरोप घेतला. आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 5 विकेट्सने पराभव केला. या पराभवाने दिल्ली कॅपीटलचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. दिल्लीच्या या पराभवाचा थेट फायदा रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला झाला आहे. या विजयामुळे मुंबई आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडल्याने बेंगळुरु प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दिल्लीला हरवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील याराना पाहायला मिळाला. 


दरम्यान, रोहित शर्माने आरसीबीला शुभेच्छा दिल्या, तर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरवर हँडशेक इमोजी पोस्ट करुन मुंबईला टॅग केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा संघ आणि त्याचे चाहतेही मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनेही सोशल मीडियावर मुंबईसाठी जल्लोष केला. त्याचवेळी विराट कोहली मुंबईला सपोर्ट करताना दिसला. याशिवाय आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर लोगोचा रंग लाल ते निळ्यामध्ये बदलला होता.


रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा


दिल्लीला पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, की 'आमच्या संघाला लय मिळायला थोडा उशीर झाला, पण किमान या स्पर्धेतून काही सकारात्मक गोष्टी तरी घेता येतील असे रोहित शर्माने म्हटले आहे. आरसीबीचे अभिनंदन, ते पात्र ठरले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वोत्तम संघ विजयी होवो. पुढच्या मोसमात चुका सुधारण्याचा प्रयत्न करू, असे रोहितने सांगितले. 8 सामने गमावल्यानंतर अडचणी आल्या, त्यामुळे आम्हाला चुका सुधारण्याची गरज होती. मला वाटते की आम्ही हंगामाच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी केली, असे रोहितने म्हटले आहे.


विराट कोहलीने केलं ट्विट 


आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मुंबईच्या विजयानंतर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने कोलकाता लिहिले आणि फ्लाइटची इमोजी टाकली. यानंतर, पुढच्या ओळीत, त्याने मुंबई इंडियन्स आणि बंगळुरु संघाला टॅग करत हँडशेक इमोजी पोस्ट केला. वास्तविक, बेंगळुरु संघ आता 25 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार आहे.