IPL Auction 2023: आयपीएलच्या मिनी लिलावात मुकेश कुमार मालामाल झाला आहे.  दिल्ली संघानं 5.5 कोटी रुपयांत मुकेश कुमारला खरेदी केलं आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात ऑक्टोबरमध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी मुकेश कुमारची भारतीय संघात निवड झाली होती. त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. पण आता आयपीएलमध्ये मुकेश कुमार मालामाल झाला आहे. मिनी लिलावात मुकेश कुमारसाठी दिल्ली आणि पंजाब या दोन संघामध्ये बिडिंग वॉर झालं. पण अखेरीस दिल्ली संघानं बाजी मारली. 
 





कोण आहे मुकेश कुमार?


मुकेश कुमार मुळचा बिहारमधील गोपालगंज येथील आहे. मुकेश कुमारला पहिल्यापासून क्रिकेट खेळणं आवडत होतं, पण बिहारचा कोणताही संघ नसल्यामुळे तो पश्चिम बंगाल संघाचा सदस्य धाला. मुकेशचे वडिल कोलकातामध्ये चालवतात, त्यामुळे त्यानं तेथील रणजी संघात जायचा निर्णय घेतला. पश्चिम बंगाल संघात स्थान मिळवण्यासाठी मुकेश कुमारला खूप मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर मुकेश कुमारला इंडिया ए संघात स्थान मिळालं होतं. त्याशिवाय नुकतीच त्याची भारतीय संघातही निवड झाली. 






मुकेश कुमाराचं करिअर -


देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुकेश कुमार पश्चिम बंगाल संघातून खेळतो. बंगाल संघाचा तो महत्वाचा सदस्य आहे. 29 वर्षीय मुकेश कुमार उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. मुकेश कुमारनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. मुकेश कुमारने आतापर्यंत 33 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 123 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेश कुमारने एका डावात सहा वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर चार वेळा चार विकेट घेतल्या आहेत.  यादरम्यान मुकेश कुमारची सरासरी  22.50 इतकी आहे तर इकॉनमी 2.75 इतकी राहिली आहे.  मुकेश कुमारने 24 लिस्ट-ए सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 44.00 इतकी राहिली आहे. तर  स्ट्राइक रेट 51 इतका राहिलाय. 23 टी20 सामन्यात मुकेश कुमारने 25 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 मध्ये मुकेश कुमारची सरासरी 24.05 आहे तर इकॉनमी 7.20 इतकी आहे.