IPL 2026 Schedule 28th March First Match : आयपीएल 2026 संदर्भात गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू होती. टी-20 विश्वचषकानंतर या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान अधिकृत प्रसारकस्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरुवात कधी होणार याची घोषणा केली. प्रसारकाने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार आहे. मात्र, अद्याप आयपीएलच्या अधिकृत स्तरावरून स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
आयपीएलच्या घोषणेला उशीर का?
5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाच्या घोषणेला उशीर होत आहे. विशेष म्हणजे ज्या तीन राज्यांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत, त्या राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. यात आसाम, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि चेन्नई (तमिळनाडू) ही अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) यांची होम ग्राऊंड आहेत, तर गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे मैदान आहे. दरम्यान, प्रसारणकर्त्यांनी आयपीएलच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली असली तरी संपूर्ण वेळापत्रकाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजेतेपद टिकवण्यासाठी उतरणार आरसीबी...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 2025 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करत प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा आरसीबीचा संघ आपले विजेतेपद टिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आरसीबीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ग्रुप टप्प्यातील पाच सामने संघ आपल्या होम ग्राऊंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेची मंजुरी मिळाली आहे.
उद्घाटन सामना कुठे होणार?
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 चा उद्घाटन सामना आणि अंतिम सामना हे दोन्हीही बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर या स्टेडियमवर एक प्लेऑफ सामना देखील आयोजित केला जाणार आहे. आरसीबीचे ग्रुप टप्प्यातील पाच सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील, तर होम फॉरमॅटनुसार उर्वरित दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.
हे ही वाचा -
