Sam Curran Injury जयपूर: आयपीएलच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चला सुरुवात होणार आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी विविध संघांचे खेळाडू जखमी होत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आयपीएलबाहेर गेला आहे. यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जकडून राजस्थान रॉयल्समध्ये आलेला ऑलराऊंडर खेळाडू सॅम कर्रन दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएलबाहेर जाण्याची शक्यता आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार सॅम कर्रन दुखापतग्रस्त झाला असून तो स्पर्धेबाहेर जाऊ शकतो.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील डील नुसार सॅम कर्रन रवींद्र जडेजासोबत राजस्थान रॉयल्सकडे आला होता. या दोघांच्या जागी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जकडे आला होता. रिपोर्टनुसार सॅम कर्रनबाबत अंतिम निर्णय घेऊ शकलेला नाही. राजस्थान रॉयल्सकडून सध्या पर्याय शोधण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
नॅथन एलिस आयपीएल बाहेर
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळं आयपीएल बाहेर गेला आहे. नॅथन एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी जोश हेजलवुडची दुखापत चिंतेचं कारण बनलेलं आहे. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्यानं कोलकाता नाईट रायडर्सला धक्का बसला आहे.
मथिशा पथिराना साठी केकेआरनं 18 कोटी रुपये मोजले होते, तो देखील खेळणार आहे की नाही याबाबत स्थिती स्पष्ट झालेला नाही. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स दुखापतीमुळं सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व ईशान किशनकडे देण्यात आलं आहे. ईशान मलिंगा आणि वानिंदू हसरंगा यांच्या फिटनेसचा प्रश्न देखील कायम आहे.
